मुंबई : इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या शनिवारपासून कोलमडलेली विमान वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. दुबई, अबुधाबीसह इतर आखाती देशांत अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी परत येण्यासाठी जादा पैसे मोजूनही विमान सेवा उपलब्ध नाही. विमान सेवा कधी सुरू होणार, विमानांचे तिकिट याबाबत विचारणा करण्यासाठी विमान कंपन्याच्या आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क साधण्याच्या प्रमाणात ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या शनिवार सकाळपासून अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात युदध पुकारले आहे. या युद्धामुळे आखातातील नऊ देशांनी हवाई निर्बंध घातले आहेत. यामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. आशिया आणि युरोपमधील विमानांच्या तिकीटांचे दर प्रचंड वाढले आहेत. जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईसह प्रमुख आखाती केंद्रे सामान्यतः दिवसाला एक हजारांहून अधिक उड्डाणे हाताळतात. ती पाचव्या दिवशी बुधवारी बंद होती.
आशिया – युरोपमध्ये थेट उड्डाणे करणाऱ्या कंपन्या मध्य पूर्वेकडील बंद हवाई क्षेत्र टाळून उत्तरेकडे काकेशस मार्गे, नंतर अफगाणिस्तान किंवा दक्षिणेकडे इजिप्त मार्गे, नंतर सौदी आणि नंतर ओमान मार्गे उड्डाण करू शकतात. परंतु यामुळे उड्डाणांच्या वेळेत आणि इंधनाच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे.
भाडेवाढीची प्रमुख कारणे
मार्गातील बदल : इराण आणि आसपासच्या देशांच्या हवाई क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमान कंपन्यांनी मार्ग टाळले आहेत. विमानांना आता लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
इंधनाचा वाढता वापर : प्रवासाचा मार्ग लांबल्यामुळे विमानांना अधिक इंधन लागत आहे. तसेच, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम तिकीट दरांवर झाला आहे.
मर्यादित जागा : अनेक विमान कंपन्यांनी आपल्या फेऱ्या रद्द किंवा मार्ग बदलले आहेत. परिणामी उपलब्ध जागा कमी आणि मागणी जास्त, अशी स्थिती आहे.
प्रवाशांचे हाल
लंडनच नव्हे, तर युरोप आणि अमेरिकेतील इतर प्रमुख शहरांतून भारताकडे येणाऱ्या विमानांच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेले भारतीय नागरिक मायदेशी परतण्यासाठी धडपडत असतानाच, गगनाला भिडलेल्या भाड्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय विमानभाड्यात मोठी वाढ केली आहे. हवाई क्षेत्रातील अस्थिरतेमुळे खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे लंडन ते मुंबई इकॉनॉमी क्लासचे तिकीट सामान्यतः २० ते ५० हजार रुपयांमध्ये असते. ते २.९ लाख रुपयांपर्यंत विकले जात आहे. तर बिझनेस क्लासचे तिकीट १.२ ते २.५ लाख रुपयांपासून वाढून ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
‘एतिहाद’ आणि ‘एमिरेट्स’कडून भारतीयांच्या सुटकेसाठी पुढाकार
यूएईमध्ये सध्या २० हजारांहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ‘एतिहाद’ एअरवेजने पुढाकार घेतला असून विशेष बचाव उड्डाणे सुरू केली आहेत. ‘एमिरेट्स’ एअरलाइन्स देखील या मोहिमेत सहभागी झाली आहे. विशेष म्हणजे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या कंपन्यांनी सोमवार आणि मंगळवारची आपली नियमित वेळापत्रकातील सर्व उड्डाणे रद्द करून, संपूर्ण ताकद अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी पोहोचवण्यासाठी लावली आहे.
