मुंबई : इराण-इस्रायल युद्धाचा सर्वाधिक परिणाम देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला बसला आहे. डिसेंबर महिन्यात वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगोची विमान सेवा आठ दिवस ठप्प होती. त्यानंतर आता २८ फेब्रवारीपासून युद्धामुळे इंडिगोची विमान सेवा कोलडमली आहे. चार महिन्यात इंडिगोच्या वाहतूकीला दोनदा खीळ बसली आहे.
आखाती देशातील हवाई निर्बंधामुळे सर्वच विमान कंपन्यांची वाहतूक कोलमडली. देशातील इंडिगो,एअर इंडिया,स्पाईस जेट सह सर्वच विमान कंपन्यांची वाहतूक शनिवार, २८ फेब्रुवारीपासून विस्कळित झाली आहे. दररोज सुमारे एक हजारांपेक्षा जास्त विमाने रद्द होत असल्याने विमान कंपन्याचे आर्थिक नुकसान होत आहे.युद्धामुळे इंडिगोच्या आतापर्यत सुमारे दोन हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी एक तृतीयांशहून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे इंडिगोचे शेअर्स १० टक्यांनी घसरल्याने बाजार भांडवलात सुमारे १७,०७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. विमाने रद्द केल्याने इंडिगोला दररोज सुमारे ४५-५० कोटी,स्पाइसजेटला दररोज सुमारे ५-५.५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोलमडल्याने विमान कंपन्यांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. भारत ते युरोपपर्यंतचे अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आखाती देशांवर अवलंबून आहेत.काही मार्गांसाठी मध्य पूर्व आणि पाकिस्तानी हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने, विमान कंपन्यांकडे मर्यादित वाहतूक (ऑपरेशनल) पर्याय उरले आहेत. अनेक ठिकाणांवरील उड्डाणे रद्द केली आहेत, तर काहींना बराच लांब मार्गांनी प्रवास करावा लागत आहे.मार्ग बदलल्याने सामान्यतः उड्डाणाची वेळ आणि इंधनाचा वापर वाढल्याने विमान कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक दबाव आला आहे.
इंधन दरवाढ
विमान इंधनाच्या किमतीत प्रति बॅरल १ डॉलर वाढ झाल्यास इंडिगोचे वार्षिक इंधन बिल सुमारे ३०० कोटी तर स्पाइसजेटचे अंदाजे २७.५ कोटी रुपयांनी वाढू शकते.याचा विमान कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
प्रमुख विमान कंपन्यांना फटका
इंडिगोच्या एकूण क्षमतेच्या सुमारे १९-२० टक्के विमान रद्द करण्याचे प्रमाण आहे. हे प्रमाण इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय क्षमतेच्या सुमारे ६०-६५ टक्के आहे.स्पाइसजेटसाठी, एकूण क्षमतेच्या सुमारे ३०-३२ टक्के संभाव्य परिणाम होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, एअर इंडियाला रद्दीकरणामुळे त्यांच्या क्षमतेच्या सुमारे ४० टक्के किंवा त्याहून अधिक भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तिकिट दरवाढीची शक्यता
उन्हाळी सुट्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासह आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विमान प्रवास करतात. या काळात विमान सेवेला प्रचंड मागणी असते. त्यातच युद्धामुळे झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी विमान कंपन्या उन्हाळी सुट्टीतील गर्दी पाहता विमान तिकिटात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.
