मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम सध्या सीएनजी – पीएनजीच्या पुरवठ्यावर झाला नसला तरी कपात होण्याची शक्यता असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले. पीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तर सीएनजी अभावी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडेल. मुंबई, ठाणे, नवी मंबई, पनवेलसह उरणमध्ये महानगर गॅस लिमिटेडतर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो.

सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक घरगुती आणि ५ हजार ६०० छोट्या व्यावसायिक – औद्योगिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस वापरला जातो. याशिवाय १२ लाखांपेक्षा जास्त वाहने सीएनजीवर धावतात. यात ४ लाख ७० हजार रिक्शा, तर दीड लाखांपेक्षा जास्त टॅक्सीचा समावेश आहे. तसेच ५ लाखांहून अधिक चारचाकी, १८०० बेस्ट बस आणि ५२ हजार ट्रक, टेम्पो सीएनजीवर धावतात. सीएनजीचा पुरवठा खंडीत झाल्यास शहरातील बेस्ट बस, शालेय बस, रिक्शा, टॅक्सीची वाहतूक पूर्णपणे कोलमडेल.

महानगर गॅस लिमिटेडचे स्पष्टीकरण

जागतिक ऊर्जा बाजारपेठांवर परिणाम करणाऱ्या घडामोडी लक्षात घेता, एमजीएलकडून ग्राहकांना गॅस पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता असल्याची अटकळ आहे. सध्या एमजीएलला गॅस उपलब्धतेत कोणतीही कपात करावी लागलेली नाही. एमजीएलच्या कार्यक्षेत्रात सामान्य सीएनजी आणि पीएनजी पुरवठा आहे. एमजीएलला घरगुती पुरवठा पूर्ण करण्यासाठी आवश्यक

१०० टक्के गॅस देशांतर्गत उत्पादित गॅसमधून मिळतो. त्याचप्रमाणे सीएनजी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेला बहुतांश गॅस देखील देशांतर्गत उत्पादित केला जातो. एलएनजी आयातीतील समस्यांमुळे एमजीएलला गॅस पुरवठा कमी झाल्यास, एमजीएलच्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना गॅस पुरवठ्यावर काही परिणाम होऊ शकतो. तथापि जवळजवळ सर्व ग्राहक एफओ, एलएसएचएस, एलडीओ, एलपीजी इत्यादी पर्यायी हायड्रोकार्बन इंधनांचा अवलंब करतात.