मुंबई : इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. युद्धामुळे रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यत मुंबई विमानतळावरील १२५ विमाने रद्द करण्यात आली. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. यात विद्यार्थी, खेळाडू, सामान्य नागरिक, पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे देशातील प्रमुख विमानतळांसह मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे रद्द केली आहेत. मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार-सोमवारची एअर इंडियाची सर्व उड्डाणे रद्द केली होती. एअर इंडियाने अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील उड्डाणे रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. याचा परिणाम मुंबई-लंडन सेवेवरही झाला आहे. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने रविवारी मुंबईला उतरविण्यात आले.
प्रवाशांचे हाल उड्डाणे रद्द झाल्याने मुंबई विमानतळ अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. मुंबई विमानतळावरुन अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. बहरीनमार्गे अमेरिकेला जाणारे प्रवासी रीबुकिंगबाबत माहिती न मिळाल्याने संभ्रमात आहेत. मुंबईहून मक्का-मदीनाला उमरासाठी जाणारे प्रवासीही अडकले आहेत. याशिवाय अबू धाबी, बहरीन आणि इटलीला जाणारे प्रवासी खोळंबले आहेत. मुंबई बाहेरुन आलेल्या प्रवाशांची सोय विमान कंपन्यांनी केली आहे.
सोमवारपर्यत उड्डाणे रद्द एअर इंडियाने रविवारी, दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या सेवा रद्द केल्या होत्या. तसेच, इंडोगोकडूनही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये जाणारे उड्डाणे रद्द केली होती. भारतीय हवाई कंपन्यांनी सोमवार, २ मार्चपर्यंत या प्रदेशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि स्पाइसजेट यांनी मध्यपूर्वेतील उड्डाणे रद्द किंवा स्थगित केली आहेत.
मुंबई विमानतळावरील रद्द विमान (दुपारी अडीच वाजेपर्यत) येणारी —५८ जाणारी —६७ एकूण—-१२५ —— प्रतिक्रिया खेळाडू अडकले देशातील १४ खेळांडू सोबत जर्मनीला ओपन युरोपियन चॅम्पियनशिपकरिता जाणार होतो.इतहाद एअऱलाइनसची तिकिटे आरक्षित होती. परंतु युद्धामुळे पुढील पाच दिवस हवाई वाहतूक बंद असल्याने कंपनीचा संदेश रविवारी मुंबई विमानतळावर आल्यावर मिळाला. त्यामुळे मुंबई विमानतळावरच अडकून पडलो. मध्यपूर्वेला न जाता लुफ्तानझा विमान कंपनीचे विमान थेट जर्मनीला जाते. तिकिट काढण्याचा प्रयत्न केला परंतु या विमानाची ७ मार्च पर्यंतची सर्व तिकिटे आरक्षित आहेत. त्यामुळे खेळाडू निराश झाले आहेत. -इरफान बोटा,कोच —- दोन वर्षाचे कष्ट वाया
राष्ट्रीय पातळीवर पदक मिळविल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली होती.शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर आला. तेव्हा युद्धामुळे विमान रद्द झाले असून खेळाडूंना पाठविण्याची विशेष सोय करण्यात येईल,असे सांगितल होते.आम्ही दुबईला विमान बदलून जाणार होतो .परंतु आता ते शक्य नाही. माझ्यासोबतच ठाणे, सातारा, कर्नाटक, छत्तीसगडचे खेळाडू आहेत. आता पुन्हा स्वखर्चाने आपापल्या घरी परत जाणार. दोन वर्षाचे कष्ट वाया जाणार –आशिष पाटील,खेळाडू,कोल्हापूर
