मुंबई : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका मुंबई महानगर प्रदेशाला बसत आहे. बांधकाम क्षेत्रासह लघु उद्योजक यामुळे अडचणीत आले आहेत. प्रोपेन आणि नैसर्गिक वायूअभावी गुजरातमधील मोरबी क्लस्टरमधील टाइल्स आणि सॅनिटरी वेअरचे (स्वच्छता सामग्री) उत्पादन ठप्प झाले आहे. युद्ध लांबले तर गृह प्रकल्पांच्या पूर्णत्वास विलंब होण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशभरातील सुमारे ८९ टक्के टाइल्स आणि सॅनिटरी वेअर मोरबी येथून येतात.
मात्र तेथील उत्पादन दोन आठवड्यांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे टाइल्सच्या दरांत वाढ झाली असून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात मोठ्या संख्येने नवीन गृह व पुनर्विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सध्या घरांच्या दरात वाढ झाली नसली तरी युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिल्यास घरांच्या किमती ५ ते ७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे पदाधिकारी आनंद गुप्ता यांनी व्यक्त केली.
बांधकाम साहित्याच्या दरात वाढ
- युद्धाची झळ बसून बांधकाम साहित्याच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. परिणामी बांधकाम खर्च वाढण्याची शक्यता आहे.
- स्टीलच्या दरात १२ ते १८ टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति टन ७० ते ७३ हजार रुपयांवर पोहोचले आहे. युद्ध सुरू राहिल्यास हा दर ८० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- सिमेंट गोणीचे दर १० ते २५ रुपयांनी वाढले आहेत. ॲल्युमिनियमचे दर १२ ते २० टक्क्यांनी वाढले असून तांबे १८ ते २२ टक्क्यांनी महागल्याची माहिती ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली.
युद्धाचा फटका आता बांधकाम व्यवसायाला बसू लागला आहे. सध्या कुठेही काम बंद झालेले नाही किंवा घरांच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र ही परिस्थिती कायम राहिल्यास प्रकल्पांना विलंब होण्याची शक्यता आहे. -केवल वलंभिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्रेडाई-एमसीएचआय युद्ध महिन्याभरात संपले नाही तर बांधकाम व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे गरज पडल्यास ‘महारेरा’कडे प्रकल्प पूर्णत्वासाठी मुदतवाढ मागण्याचा निर्णय घेण्यात येईल. -आनंद गुप्ता, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया
ठाणे जिल्ह्यात लघु उद्योजकांचे नुकसान
ठाणे : युद्धाचा फटका ठाणे जिल्ह्यातील लघु उद्योजकांना बसू लागला आहे. ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगनगरीत कच्च्या मालामध्ये झालेली दरवाढ, अपुरा गॅसपुरवठा, मजुरांचे स्थलांतर यामुळे उत्पादनांवर परिणाम होत आहे. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांचे महिनाभरात हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नवी मुंबईत २५ टक्के कामगार परतीच्या वाटेवर
नवी मुंबई : उत्पादन खर्चात झपाट्याने झालेली वाढ, पुरवठा साखळीतील खंड आणि गॅसटंचाई या पार्श्वभूमीवर सुमारे २० ते २५ टक्के कामगार परतीच्या वाटेवर असल्याने नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची चिंता अधिक वाढली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावरील अनिश्चिततेमुळे कच्च्या मालाची आयात उशिरा होत असून अनेक उद्योगांचा साठा संपत आला आहे. परिणामी, काही उद्योगांनी उत्पादन कमी केले असून काही ठिकाणी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात सुमारे ४ ते ५ लाख कामगार आहेत.
