मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धामुळे परदेशी हवाई प्रवासाची अनिश्चितता आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आंतरराष्ट्रीय प्रवासापेक्षा देशांतर्गत सहलींना नागरिक पसंती देत आहेत. देशांतर्गत पर्यटनाकरिता यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्के जादा विचारणा होत आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळणार आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रतील नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर जातात. उन्हाळी सुट्टीत कोणत्या देशात, राज्यात फिरायला जायचे याचे बेत फेब्रुवारी महिन्यापासूनच ठरतात. त्यानुसार विमान, हॉटेलचे आरक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांपासून विविध देशांमध्ये फिरायला जाण्यास नागरिकांची पसंती देत आहे. परंतु यंदा मात्र २९ फेब्रुवारीपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला. या युद्धामुळे जगातील हवाई वाहतूक कोलमडली आहे.

आखाती देशांसह जगातील अनेक देशांतील विमानांच्या तिकीट दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच युद्ध कधी थांबेल आणि विमान वाहतूक कधी सुरळीत होईल याचा कोणताही अंदाज नसल्याने नागरिकांनी यंदा परदेशाऐवजी देशांतर्गत पर्यटनावर भर दिला आहे. देशांतर्गत पर्यटनासाठी उत्तर-पूर्व आणि पूर्वेकडील राज्यांना पहिली पसंती दिली जात आहे.

सिंगापूर, बाली, श्रीलंका येथील पर्यटनावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र इतर ठिकाणच्या सहलींची चौकशी सध्या थंडावली आहे. सिंगापूरसारख्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना जागतिक युद्ध परिस्थितीचा फटका बसलेला नाही.

देशांतर्गत पर्यटनाला चांगले दिवस

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम हल्लानंतर ऑपरेशन सिंदूरसाठी बंद ठेवण्यात आलेले विमानतळ, लडाखमध्ये निर्माण झालेली अशांतता याचा विपरित परिणाम देशांतर्गत पर्यटनावर झाला होता. काश्मिरातील सहली रद्द झाल्या होत्या. यंदा मात्र देशांतर्गत सहलींचे प्रमाण वाढणार आहे. अरुणाचल, मेघालय, आसाम, दार्जिलिंगसह यंदा लाचुंग आणि लाचेन तीन ते चार वर्षांनी पर्यटकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे ईशान्य भारताकडचा पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे. यामुळे यंदा देशांतर्गत पर्यटनाला चांगले दिवस येतील, अशी आशा पर्यटन व्यावसायिकांना आहे.

यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत सहलीसाठी चौकशी वाढली आहे. काश्मीर, उत्तराखंड, चारधाम, सिक्किमसह उत्तर-पूर्व आणि पूर्वेकडील राज्यांना भेटी देण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. देशांतर्गत पर्यटनासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्के विचारणा वाढली आहे. – ऋषिकेश पुजारी,विहार ट्रॅव्हल्स