मुंबई : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य-पूर्वेतील हवाई सेवांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. हवाई क्षेत्र बंद आणि निर्बंध लादल्यामुळे आतापर्यंत मुंबई विमानतळावरील ३५० पेक्षा जास्त विमानांना फटका बसला आहे. विमानांचे आगमन आणि उड्डाण रद्द झाल्याने हजारो प्रवासी बेहाल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विमान वाहतूक कोलमडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

युद्धाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगातील हवाई क्षेत्रावरही झाला आहे. मध्य-पूर्वेतील अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद किंवा निर्बंधांमुळे मुंबई विमानतळावरील एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटने गेल्या तीन दिवसांत सुमारे ३५० हून अधिक मार्गांवरील उड्डाण-आगमन रद्द केली. तसेच युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. यामुळे विमान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इंडिगोने परतफेडीबद्दल काय म्हटले ?

इंडिगो मध्य-पूर्व आणि इतर प्रभावित आंतरराष्ट्रीय क्षेत्रांना जाणाऱ्या आणि येथून येणाऱ्या विमानांसाठी २८ फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या आरक्षित केलेल्या तिकिटाचा परतावा प्रवाशांना ७ मार्चपर्यंत देणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत, प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पूर्ण परतफेड किंवा त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक बदलू शकतात.

दुबईहून रविवारी रात्री एक विमान मुंबईत दाखल

इराणने दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर जगभरातील विमान प्रवाशांवर त्याचा परिणाम झाला. हल्ल्यानंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले. दुबई विमानतळही बंद केल्याने अनेक उड्डाणे रद्द केली. यामुळे दुबईला फिरण्यासाठी गेलेले अनेक प्रवासी तेथे अडकून पडले आहेत. दुबईहून आलेले एक विमान रविवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानातून ३५० प्रवासी सुखरुप मुंबईत दाखल झाले.

प्रवाशाचा अनुभव

मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो. दुबईहून आमचे पुढील विमान अमेरिकेसाठी होते. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो. बराच वेळ झाला तरी विमानाचे उड्डाण झाले नाही, तेव्हा चौकशी केली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. ७-८ तासांनतर आम्हाला युद्ध सुरू झाल्याने विमानाचे उड्डाण होणार नसल्याचे सांगण्यात आले. दुबई विमानतळावर मोठी धावपळ होती. एमिरेट्सच्या बस-गाड्या विमानतळावर आल्या आणि आम्हाला हॉटेलमध्ये सोडले. यादरम्यान आम्ही बॉम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिल्याचे प्रवासी अजय यांनी सांगितले.