मुंबई : इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले सुरु करण्यात आले असून याचे थेट पडसाद मुंबईत उमटलेले नसले तरीही मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील पारशी समुदायामध्ये यामुळे काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. इराणमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असताना पारशी समूहातून झोराष्ट्रियन समुदायविषयी प्रार्थना करणेच इतकेच आपल्या हातात आहे अशी भावना व्यक्त होत आहे.
मुंबईचे पर्शियन मुळांशी असलेले नाते युद्धसदृश्य परिस्थितीत अधिक तीव्रतेने समोर येते. शहरातील प्रसिद्ध इराणी कॅफे, सिनेगॉग, इराणी वास्तूशैलीच्या मशिदी, डोंगरी परिसरातील मुघल मशीद ही पर्शियन शैली आणि नक्षीने सजलेली मशीद या सगळ्या या शहरात असलेल्या पर्शियन खुणा आहेत. १९व्या शतकात इराणी व्यापाऱ्यांच्या सहकार्याने उभारलेली ही वास्तू म्हणजे तत्कालीन मुंबईचे बुशेहर आणि बंदर अब्बाससारख्या बंदरांशी असलेले सागरी व्यापारमार्ग यांचे सहज स्मरण करून देते.
अनेक शतकांपूर्वी भारतात येऊन स्थायिक झालेला झोराष्ट्रियन म्हणजेच पारशी समाज हा देखील मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या समुदायाचे अनेक धार्मिक विधी, प्रार्थना आणि काही प्रमाणात भाषिक शैली ही आजही त्यांच्या इराणी मूळ संस्कृतीची आठवण करून देणारी आहे. शहरात आज अशा अनेक अग्यारी आहेत ज्या अनेक शतके मुंबई आणि इराणी संस्कृतीच्या सांस्कृतिक पाऊलखुणांची साक्ष देतात. इराण – इस्रायल युद्धामुळे मुंबईतील पारशी समुदायातही अस्वस्थता पसरली आहे.
इराणमध्ये असणारी अग्नीमंदिरे (अग्यारी) ही इथल्या पारशी समुदायासाठी पवित्र असून झोराष्ट्रियन राजांशी संबंधित सहा मोठी मंदिरे आहेत. या सगळ्या समृद्ध वारसा नष्ट होऊ नये अशीही चिंता इथल्या पारशी समाजाला सतावते आहे. तर काहींनी आधीच झोराष्ट्रियन नागरिकांच्या लोकसंख्यते घट होत असताना या युद्धाच्या परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली आहे. तर सध्याच्या परिस्थितीत अनेकांनी इराणमधील झोराष्ट्रियन समुदायासाठी केवळ प्रार्थना करणे इतकेच आपल्या हातात आहे अशी भावना व्यक्त केली आहे.
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये सध्या असणारा तणाव आणि युद्धसदृश्य परिस्थिती यांचा थेट इथल्या दैनंदिन जीवनावर परिमाण होत नसला तरीही इथल्या मातीत रुजलेल्या आणि आता इथेच स्थिरावलेल्या अनेकांच्या त्यांच्या मूळ संस्कृतीच्या आठवणींना, त्यांच्या पवित्र धार्मिक स्थळांविषयी असणाऱ्या भावना यांना उजाळा मिळत आहे. त्याचप्रमाणे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी दोन्ही समुदायांशी संबंधित प्रार्थना स्थळे, सांस्कृतिक प्रतीके यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
