US-sanctioned oil tankers seized near Mumbai: अमेरिकेने निर्बंध लादलेली इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताकडून मुंबईच्या जवळ जप्त करण्यात आली आहेत. अवैध व्यापार रोखण्यासाठी भारताने केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे. पण, इराणी तेल कंपनीने या जहाजांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सोमवारी याबाबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
ओळख बदलून बेकायदेशीरपणे व्यापार
‘स्टेलर रुबी’ (Stellar Ruby), ‘अस्फाल्ट स्टार’ (Asphalt Star) आणि ‘अल जाफझिया’ (Al Jafzia) अशी जप्त करण्यात आलेल्या तीन जहाजांची नावे आहेत. एका भारतीय अधिकाऱ्याने याबाबत ०६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया एक्सवरुन एक पोस्ट केली होती. ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली होती. दरम्यान, आता या कारवाईला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. जहाजे ओळख बदलून बेकायदेशीरपणे सागरी हद्दीत घुसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
सागरी हद्दीत अवैध कारभाराला भारताचा विरोध
कच्च्या तेलाचा मूळ स्त्रोत लपवून ठेवण्यासाठी समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात तेल हस्तांतरित केले जाते, अशा बेकायदेशीर कामांसाठी भारतीय सागरी हद्दीचा वापर केला जाऊ नये, अशी भारत सरकारची भूमिका आहे. मुंबईपासून १०० नॉटिकल मैलावर भारतीय तटरक्षक दलाने जहाजे रोखून ही कारवाई केली. अमेरिकेने भापतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरुन १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर करण्यात आलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.
तटरक्षक दलाने सागरी हद्दीत देखरेख वाढवली
या अवैध प्रकारानंतर भारतीय तटरक्षक दलाने सागरी हद्दीत देखरेख वाढवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तटरक्षक दल सागरी क्षेत्रावर २४ तास पाळत ठेवत आहे. यासाठी ५५ जहाजे आणि १० ते १२ विमाने गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी तटरक्षक दलाने कठोर पावले उचलली असल्याची माहिती आहे.
जप्त केलेल्या जहाजांचा इराणशी संबंध
भारताने जप्त केलेल्या तीनपैकी दोन जहाजांचा संबंध थेट इराणशी असल्याचे तपासातून समोर आले आहे. अल जाफझिया आणि स्टेलर रुबी हे दोन्ही जहाजांचा इराणशी संबंध असल्याचे समोर आले आहे. स्टेलर रुबीवर तर इराणचा ध्वज आढळून आला आहे. कागदपत्रांची फेरफार, तेलाची अदलाबदली आणि सवलतीचे आमिष दाखवून अवैध व्यापाराचे रॅकेट चालवले जाते, असे तपासातून उघड झाले आहे.

