मुंबई : अमेरिका – इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असून गेल्या पाच दिवसांत इराणमधील १ हजारहून अधिक नागरिक मारले गेले, असे ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्व देशांमधील अनेक इमारतींचे, स्थळांचे नुकसान होत आहे. इराणमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यात १३४ वर्षे जुन्या एका ऐतिहासिक हिंदू मंदिराचाही समावेश आहे.
हिंदू मंदिरे ही केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही आहेत. यापैकी काही मंदिरे हजारो वर्षे जुनी, काही मागील २०० वर्षांपूर्वीची तर काही अगदी अलीकडे जिथे भारतीयांची संख्या मोठी आहे अशा देशात बांधण्यात आली आहेत. जगभर असेलल्या मंदिरांपैकी एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे इराणमधील ‘होरमोजगान’ या प्रांतातील बंदर अब्बास येथील ‘विष्णू मंदिर’. इराणमधील हे एकमेव हिंदू मंदिर मानण्यात येते. तसेच झाहेदान शहरात शीख समुदायासाठी गुरुद्वारा बांधण्यात आला होता, तो अजूनही अस्तित्वात आहे.
हे ‘विष्णू मंदिर’ मंदिर कुणी बांधले ?
भारताचे आणि इराणचे व्यापारी संबंध हजारो वर्षे जुने आहेत. हडप्पा संस्कृतीतही भारत आणि इराणचे व्यापारी संबंध होते असे उल्लेख आढळतात. यामुळे इराणी व्यापारी जसे भारतात येत होते याप्रमाणे भारतीय व्यापारीही इराणमध्ये जात होते. एका माहितीच्या आधारे, ब्रिटिशकाळात भारत आणि इराणचे व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणावर होते. याच काळात भारतातून बंदर अब्बास येथे व्यापारासाठी जाणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनी १८९२ साली हे ‘विष्णू मंदिर’ बांधले.
या मंदिराची रचना कशी आहे ?
‘बंदर अब्बास हिंदू मंदिर’ या नावाने हे मंदिर प्रसिद्ध असून अतिशय गजबजलेल्या अशा प्रसिद्ध ‘इमाम खोमेनी स्ट्रीटवर’ हे मंदिर आहे. या मंदिराची रचना हिंदू मंदिरांपेक्षा वेगळी आहे. तसेच या मंदिराचा कळस वैशिट्यपूर्ण आणि अनोखा आहे. मंदिरातील वास्तुकलेमध्ये भारतीय शैली आणि स्थानिक पर्शियन शैली यांचा संगम पाहायला मिळतो. या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विष्णूची प्रतिमा असून मंदिरात इतर ठिकाणी श्रीकृष्ण, नृसिंह, गौतम बुद्ध यांच्या पुरातन मूर्ती आहेत. तसेच काही जुन्या वस्तूंचेही जतन करण्यात आले असून त्याचेही प्रदर्शन या मंदिरात पाहयला मिळते. या मंदिराचे १९९८ साली इराण सरकारने नूतनीकरण केले. एका माहितीच्या आधारे, सध्या या मंदिराची देखभाल इराणच्या सांस्कृतिक केंद्रामार्फत करण्यात येत आहे.
