मुंबई : आयआरसीटीसी (पश्चिम विभाग) आणि राज्यात शासनाच्या वन विभागाने राज्यातील वन्यजीव पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्यातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांसाठी रेल्वे प्रवास, निवास, स्थानिक वाहतूक आणि हमखास सफारी परवान्यासह विशेष पर्यटन पॅकेज उपलब्ध होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त २९ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात हा करार करण्यात आला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, अतिरिक्त मुख्य सचिव (वन) मिलिंद म्हैसकर आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स) एम. श्रीनिवास राव आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी आणि आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.

पाच पर्यटन विशेष पॅकेजेस सुरू करणार

– आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे वरिष्ठ प्रवक्ते डॉ. ए. के. सिंह यांनी सांगितले की, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, आयआरसीटीसीच्या पर्यटन व्यवस्थापनातील अनुभव आणि रेल्वे नेटवर्कला महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव संवर्धन उपक्रमांची जोड देण्यात आली आहे.

– या कराराअंतर्गत आयआरसीटीसी लवकरच महाराष्ट्र वन्यजीव पर्यटनाची पाच विशेष पर्यटन पॅकेजेस सुरू करणार आहे. या पॅकेजमध्ये रेल्वेचे निश्चित आरक्षण, हॉटेलमध्ये निवास, स्थानिक वाहतूक आणि निश्चित वन्यजीव सफारी परवान्याचा समावेश असेल.

– वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार, पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी, कुटुंबीय आणि साहसी पर्यटकांसाठी हा उपक्रम अधिक सोयीचा ठरणार आहे.

– या उपक्रमांतर्गत पेंच राष्ट्रीय उद्यान, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उमरेड – करहांडला वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटकांना राज्यातील सर्वोत्तम वन्यजीवस्थळांचा सुरक्षित आणि सुलभ अनुभव देतानाच पर्यावरणपूरक पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल. या भागीदारीमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास, स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास आणि महाराष्ट्राची देशातील अग्रगण्य वन्यजीव पर्यटन राज्य म्हणून ओळख अधिक बळकट होईल, असे गौरव झा यावेळी म्हणाले.