मुंबई : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) मुंबईहून ‘जपान – द गोल्डन रूट विथ हिरोशिमा’ ही विशेष आंतरराष्ट्रीय गट सहल जाहीर केली आहे. २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील ८ रात्री आणि ९ दिवसांच्या या सहलीत जपानमधील टोकियो, माउंट फुजी, क्योटो, ओसाका, नारा आणि हिरोशिमा या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग, मुंबईतर्फे ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या टूरसाठी एअर इंडियाद्वारे प्रवास होणार असून, ट्विन-शेअरिंग आधारावर प्रति व्यक्ती ३ लाख ३६ हजार २०० रुपये शुल्क असून त्यावर अतिरिक्त २ टक्के टीसीएस आकारण्यात येणार आहे.

आधुनिकता, संस्कृती आणि इतिहासाचा संगम

या विशेष सहलीत जपानमधील आधुनिक आकर्षण, पारंपरिक संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा समतोल साधण्यात आला आहे. सहलीला टोकियोपासून सुरुवात होईल. त्यामध्ये टीम लॅब प्लॅनेट, अकिहाबाराहा, सेन्सो-जी मंदिर, टोकियो स्कायट्री, शिबुया क्रॉसिंग या स्थळांना भेट दिली जाईल. त्यानंतर पर्यटक माउंट फुजीच्या पाचव्या स्थानकाला भेट देतील. त्यासोबत हाकोने रोपवे आणि आशी सरोवरचा अनुभवही घेता येईल. हामामात्सु आणि नागोया येथे मुक्कामासह टोकियो संग्रहालय किंवा एससीमॅग्लेव्ह आणि रेल्वे पार्क यांना भेट देण्याची संधीही मिळेल. पुढील टप्प्यात क्योटो, ओसाका आणि नारा येथे अराशियामा बांबू ग्रोव्ह, नारा पार्क, फुशिमी इनारी-ताइशा, तोदाई-जी आणि ओसाका अक्वेरियम कैयुकान यांसारख्या सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली जाणार आहे.

शिंकान्सेन बुलेट ट्रेन हे मुख्य आकर्षण

या सहलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे जपानच्या जगप्रसिद्ध शिंकान्सेन बुलेट ट्रेनने हिरोशिमापर्यंतचा प्रवास. हिरोशिमामध्ये पीस मेमोरियल पार्क आणि मियाजिमा बेट यांना भेट दिल्यानंतर पर्यटक पुन्हा टोकियोला परततील. तेथे सुमो शो आणि ओडाइबा परिसरालाही भेट दिली जाणार आहे.

‘प्रवासाची चिंता आम्ही करू, अनुभव तुम्ही घ्या’

जपानमध्ये प्राचीन परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनोखा संगम आहे. या सहलीद्वारे मुंबईतील प्रवाशांना सर्व प्रवास व्यवस्थेची जबाबदारी आयआरसीटीसीकडे ठेवून जपानचा समृद्ध आणि संस्मरणीय अनुभव घेता येईल. टोकियो, माउंट फुजी, क्योटो, ओसाका, नारा, हिरोशिमा आणि शिंकान्सेनचा प्रवास यांचा समावेश असल्याने भारतीय पर्यटकांसाठी हा विशेष अनुभव ठरेल, असे आयआरसीटीसीचे पश्चिम विभागाचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

पॅकेजमध्ये काय-काय मिळणार ?

– एअर इंडियाच्या विमानातून परतीचा प्रवास

– तीन स्टार हॉटेलमध्ये निवास

– दररोज नाश्ता

– भारतीय पद्धतीचे दुपारचे व रात्रीचे जेवण

– शिंकान्सेन बुलेट ट्रेनचे तिकीट

– सामान हस्तांतरण सुविधा

– सर्व प्रेक्षणीय स्थळांची सहल व प्रवेश तिकीटे

– जपान व्हिसा शुल्क

– प्रवास विमा

– स्थानिक मार्गदर्शक

आरक्षणाची सुविधा कुठे ?

आयआरसीटीसी टूरिझमच्या अधिकृत पोर्टलवर या सहलीचे ऑनलाइन आरक्षण करता येईल. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील आयआरसीटीसी पर्यटन कार्यालयांमध्ये ऑफलाइन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे.