मुंबई : भारतीय रेल्वे लवकरच इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) नव्या संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर करणार आहे. जयपूर येथील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमएनआयटी) विद्यार्थ्यांनी संकेतस्थळातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन ही सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली आहे.
आयआरसीटीसी आणि रेल्वे माहिती प्रणाली केंद्राच्या (क्रिस) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एमएनआयटीच्या विद्यार्थ्यांना नव्या संकेतस्थळाची बीटा आवृत्ती दाखवली. अंतिम सादरीकरणापूर्वी आणखी अभिप्राय घेण्यात येणार आहे. सुधारित संकेतस्थळामध्ये चार महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनावश्यक कॅप्चा, पॉप-अप आणि चमकदार ग्राफिक्स काढून टाकण्यात आले आहेत. सर्व श्रेणींतील आसन उपलब्धता एकाच स्क्रीनवर दिसणार आहे. तिकीट आरक्षणासाठी लागणाऱ्या टप्प्यांची संख्या कमी करण्यात आली असून, वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवाशांची माहिती जतन करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, या संकेतस्थळाला भारतीय रेल्वेच्या नव्या पॅसेंजर रिझर्वेशन इंजिनशी जोडण्याचे काम सुरू आहे. सुमारे चार दशकांपासून वापरात असलेल्या आरक्षण प्रणालीचेही आधुनिकीकरण करण्यात येत असून, हे नवीन इंजिन पुढील काही महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे आयआरसीटीसीचे पूर्णपणे अद्ययावत पोर्टलही त्यानंतर उपलब्ध होईल.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट आरक्षणामध्ये बॉट्सचा वापर रोखण्यासाठीही विविध उपाययोजना केल्याचे सांगितले. या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ही लढाई सातत्याने सुरू ठेवावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वेच्या ‘रेलवन’ ॲपचे डाउनलोड्स ४ कोटींचा टप्पा पार झाले असून, रेल्वेच्या विविध सेवांसाठी हे सर्वात मोठे एकात्मिक तिकीट आरक्षण ॲप ठरल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक बिघाड होत होता. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढणे कठीण होत होते. तसेच भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यास प्रचंड कसरत करावी लागते. तर, प्रतीक्षा यादीतील तत्काळ तिकिटे मिळत असल्याने, प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
एका सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन तत्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे १० पैकी ७ जणांनी मत व्यक्त केले. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटात तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. त्यावर उपाय म्हणून तिकीट प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच आता आयआरसीटीसीच्या नव्या संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर केली जाईल.
