विविध आरोपांच्या गर्तेत अडकलेल्या एकनाथ खडसे यांच्याकडील महसूल खात्याचा पदभार हलका चर्चा सुरू झाल्यानंतर मंगळवारी खडसेंनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारून स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी कॅबिनेट बैठकीला जाण्याऐवजी स्वत:च्या मतदारसंघातील मुक्ताई देवीच्या यात्रेला हजेरी लावणे पसंत केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपेक्षा मला मुक्ताई देवीचा सोहळा महत्त्वाचा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष गोष्ट म्हणजे याठिकाणी खडसेंनी लाल दिव्याची गाडी न आणता खासगी गाडीतून आले. त्यामुळे खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. मात्र, कुणी कितीही टिव टिव, काव काव केली तरी मुक्ताईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी निश्चिंत असल्याचेही खडसेंनी यावेळी सांगितले.
खडसेंचा पाय खोलात! 
गेल्या काही दिवसांत चहुबाजूंनी होत असलेल्या आरोपांमुळे एकनाथ खडसे चांगलेच बेजार झाले आहेत. जमीन घोटाळाप्रकरणी पोलिसांत दाखल झालेली तक्रार, दाऊदशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात दाखल झालेली याचिका, जळगावात सिंचन ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा अंजली दमानिया यांनी केलेला आरोप या सगळ्यामुळे खडसे यांचा पाय अधिकच खोलात जाताना दिसत आहे. त्यातच खडसे यांच्याविरोधात आणखी दोन-तीन प्रकरणे बाहेर येण्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. मात्र, खडसे यांनी आज थेट कॅबिनेट बैठकीला दांडी मारून जत्रेला हजेरी लावल्याने ही भेट तितकीशी दिलासादायक ठरली नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, आगामी दिवसांत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात यावर खडसेंचे भवितव्य अवलंबून आहे. खडसेंवरील खात्यांचा अतिरिक्त ‘भार’ हलका केला जाण्याची शक्यता पक्षातून व्यक्त होत आहे.