उच्च न्यायालयाची ‘एमसीए’ला विचारणा

भारतीय प्रिमिअर लीग म्हणजेच ‘आयपीएल’ची स्पर्धा ही खेळ आहे की व्यवसाय, असा सवाल करत त्याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) शुक्रवारी दिले. एवढेच नव्हे, तर नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यांदरम्यान मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पालिकेचे पाणी वापरण्यात आले होते का, असा सवाल करत त्याचेही स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाने आदेश ‘एमसीए’ला दिले.

गेल्या वर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ‘आयपीएल’च्या सामन्यांदरम्यान खेळपट्टी आणि मैदानाच्या देखभालीसाठी मात्र पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संस्थेने केला होता. त्याची दखल घेत ३० एप्रिल २०१६ नंतरचे मुंबईसह राज्यात खेळवले जाणारे सगळे सामने अन्यत्र हलवण्याचे आदेश न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयल्) दिले होते.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यांदरम्यान मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पालिकेचे पाणी वापरण्यात आले होते का, अशी विचारणा न्यायालयाने ‘एमसीए’कडे केली. तसेच त्याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले. शिवाय पाणी नियोजनाच्या धोरणानुसार, आतापर्यंत या सामन्यांसाठी व्यावसायिक व औद्योगिक श्रेणीतून पाणी देण्यात येत होते हे उघड झाल्यानंतर ‘आयपीएल’ हा खेळ आहे की व्यवसाय आहे, असा सवाल न्यायालयाने केला. ‘आयपीएल’ हा खेळ असेल तर त्याकरिता देण्यात येणारे पाणी हे या श्रेणीतून दिले जाऊ शकते का, असेही न्यायालयाने विचारले.