किरीट सोमय्या यांनी दबाव आणला आणि पाडकाम झालं. त्यानंतर किरीट सोमय्या हे वांद्रे या ठिकाणी जाणार होते. मात्र तुम्ही जाऊ नका असं सांगत त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर ते म्हाडा कार्यालयात गेले. म्हाडा कार्यालयामध्ये त्यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली. अनिल परब यांना खंडणी, वसुली करताना मराठी माणूस आठवला नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर त्यांनी वांद्रे या ठिकाणी जाणं टाळलं मात्र तिथलं अनधिकृत बांधकाम पाडल्याचे फोटो ट्विट केले. यानंतर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडा कार्यालयाच्या बाहेर जमले आहेत. त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच अनिल परब हे म्हाडा कार्यालयात गेले आहेत. समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असाही निर्धार ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल परब यांची कार रोखली

म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या गर्दीसह गेल्यानंतर आमदार अनिल परब यांची कार रोखण्यात आली. ज्यानंतर त्यांच्यासोबत आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. या सगळ्यांशी संवाद साधून अनिल परब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी बोलायला गेले आहेत.

वांद्रय़ातील बांधकामाशी परब यांचा संबंध नाही; शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घेरावानंतर ‘म्हाडा’चा निर्वाळा

काय म्हणाले आहेत ठाकरे गटाचे शिवसैनिक?

किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. माध्यमांकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं. आमची मागणी ही आहे की म्हाडाची जी लेआऊट आहेत ती आजची नाहीत. मग तुम्ही आजच हे का करत आहात? लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. किरीट सोमय्यांसारखे दलाल मोदी सरकारने नेमले आहेत. आजपर्यंत इडीच्या कारवाया इतक्या लोकांवर झाल्या होत्या पण भाजपासोबत गेल्यावर कारवाई का केली नाही? भाजपात गेल्यावर ते सगळे पवित्र होतात का? असा प्रश्न इथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विचारला. अनिल परब हे तळागाळातले नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत त्यामुळेच त्यांना त्रास दिला जातो आहे.

पाडकाम किरीट सोमय्यांमुळेच झालं आहे. त्यामुळे आम्ही याबाबत जाब विचारणारच असंही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या नारायण राणेंच्या विरोधात बोलत होते ते आज का बोलत नाहीत? अनिल परब यांना फोडण्यासाठी हा दबाव निर्माण करायचा आहे असाही आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is kirit somaiya a broker of bjp criticism of thackeray group workers outside mhada office scj
First published on: 31-01-2023 at 14:58 IST