प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या १२ डिसेंबर २०१८ रोजी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान निवासस्थानी इशा अंबानी आनंद पिरामल बरोबर विवाहबद्ध होणार आहे. भारतीय संस्कृती, परंपरेनुसार या विवाहाचे विधी होतील. अंबानी कुटुंबाकडून आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे या विवाहाची तारीख जाहीर करण्यात आली. मुंबईतील अंबानींच्या निवासस्थानी होणाऱ्या या लग्नाला कुटुंबिय आणि निवडक मित्र परिवार उपस्थित असेल.

मे महिन्यात दोघांच्या विवाहाची घोषणा करण्यात आली होती. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आहे. आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. लग्नाच्या आधी उदयपूरमध्ये अंबानी आणि पिरामल कुटुंबियांकडून मित्रमंडळी आणि कौटुंबिक सदस्यांचे आदिरातिथ्य केले जाईल. आनंद आणि इशाच्या नव्या प्रवासासाठी दोन्ही कुटुंबांनी आशिर्वाद आणि सदिच्छा मागितल्या आहेत.

आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती.

सध्या या माध्यमातून एका दिवसांत ४० हजारहून अधिक रूग्णांची तपासणी केली जाते. आनंद इंडियन मर्चंट चेंबर-यूथ विंगचा सर्वांत युवा अध्यक्षही राहिला आहे. इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे.