मुंबई : ”आयसिस” या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी दिली आणि विद्यमान सरकार तसेच न्यायव्यवस्थेबद्दल अनादर व्यक्त केला.
आरोपीच्या या आक्रमक वर्तनानंतर, पुढील आदेशापर्यंत त्याला केवळ दृकश्राव्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, खटल्याच्या कार्यवाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तो केवळ मानसिक समस्यांचे नाटक करत असल्याचेही न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केले. तीन वर्षांपूर्वी, २०२३ मध्ये अटक करण्यात आलेला आरोपी ताबीस सिद्दीकी याला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांच्यासमोर हजर केले असता, त्याने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि न्यायाधीशांना त्यांचे नाव विचारले. सिद्दीकी याने, त्याला विद्यमान सरकारबद्दल कोणताही आदर नसल्याचेही म्हटले. न्यायालयाने या घटनेबाबत नोंदवलेल्या आदेशानुसार, आरोपीने न्यायव्यवस्थेबद्दल अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला आणि त्याने त्याला न्यायालयाबद्दल कोणताही आदर नसल्याचे म्हटले.
सिद्दीकीने एवढ्यावरच न थांबता न्यायाधीशांना, तो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पाहून घेईल, अशी धमकी दिली. न्यायालयाने आरोपीच्या वर्तनाचा निषेध केला आणि ते अत्यंत निंदनीय असल्याचे आदेशात म्हटले. आरोपीच्या वैद्यकीय अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर, जे.जे. रुग्णालयात त्याची मानसोपचार चाचणी करण्यात आली होती आणि अहवालात सध्या त्याला कोणताही गंभीर मानसिक आजार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे, आरोपी केवळ खटल्याच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी मानसिक समस्यांचे नाटक करत आहे हे स्पष्ट होते, असे न्यायालयाने नमूद केले.
प्रकरण काय ?
”आयसिस” या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणाच्या निमित्ताने जुलै २०२३ मध्ये राज्यात टाकण्यात आलेल्या विविध छाप्यांदरम्यान एनआयएने सात आरोपींना अटक केली होती. त्यात सिद्दीकीचाही समावेश होता. एनआयएच्या आरोपांनुसार, आरोपींचे ”आयसिस”शी सक्रिय संबंध होते आणि ते असुरक्षित तरुणांना या दहशतवादी संघटनेचा भारत-विरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. आरोपींच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान दहशतवादी संघटनेशी संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह आक्षेपार्ह साहित्य तसेच समाजमाध्यमांवरील पोस्ट्स सापडल्या. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपींवरील उपरोक्त आरोप उघड झाले आहेत, असाही एनआयएचा दावा आहे.
