मुंबई : इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेली टिप्पणी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी म्हटले आहे. लापिड यांच्या विधानामुळे भारत-इस्रायल संबंधांना धक्का बसला असला तरी या वादामुळे उलट दोन्ही देश अधिक जवळ येतील असा दावा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष असलेल्या लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,’ अशा शब्दांत टीका केली होती. यावर काश्मीर फाइल्सचे मुख्य कलाकार अनुपम खेर, निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार आक्षेप घेतला. शोशानी यांनी मंगळवारी खेर यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘आपण स्वत: किंवा इस्त्रायल सरकार अधिकृतरित्या किंवा अनधिकृरित्या लापिड यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत नाही. हा चित्रपट म्हणजे प्रचारपट नाही, तर त्यातून विस्थापित झालेल्या नागरिकांची व्यथाच मांडली गेली आहे’, असे शोशानी म्हणाले. ‘सोमवारी लापिड यांनी हे विधान केल्यानंतर आज सकाळी मी पहिला दूरध्वनी खेर यांना केला, तो माफी मागण्यासाठी. लापिड यांच्या विधानाशी इस्रायलचा कोणताही संबंध नाही, हेदेखील मी त्यांना सांगितले.’ या वादामुळे भारत-इस्रायलचे संबंध अधिक दृढ होतील असा दावाही शोशानी यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel diplomats apologise on nadav lapid remark on kashmir files zws
First published on: 30-11-2022 at 05:13 IST