मुंबई: इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील १०३ बांधकाम कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी उद्या, गुरुवारी रोजी रवाना होत आहे. महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत व इस्रायल सरकारच्या समन्वयाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत बांधकाम क्षेत्रातील गिलावा काम (प्लास्टरिंग), सिरेमिक फरशी बसविणे (सिरेमिक टायलिंग), इमारतींचे सांगाडे/फ्रेमवर्क तयार करणे आणि लोखंड वाकविणे (आयर्न बेंडिंग) या चार व्यवसायांतील कामगारांची निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत सुमारे ४ लाख कामगारांची छाननी करण्यात आली. १२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून खुल्या कॅम्पस भरतीद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचण्यात आले. तसेच ३ लाखांहून अधिक कामगारांशी दूरध्वनी व लघुसंदेश द्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ९९७ उमेदवार निवडले गेले. वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नाव पडताळणी प्रक्रियेनंतर ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली. या उमेदवारांचे टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी प्रस्थान नियोजित आहे.

इस्रायली प्रशिक्षक यांनी २२ ते २५ जुलै दरम्यान प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. त्यानंतर १०३ उमेदवारांनी इस्रायली मानकांनुसार रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केले. १०३ कामगारांपैकी ६० कामगारांची पहिली तुकडी गुरुवारी मुंबईहून इस्रायलकरिता रवाना होणार आहे. सदर कामगार तेल अवीव येथे काम करणार आहेत. यावेळी बांधकाम कामगारांना त्यांच्या प्रस्थानपूर्व मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रवासाची कागदपत्रे, आवश्यक माहिती तसेच व्हिसा व विमान तिकिटांचे वितरण करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर’ या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या रवाना होणाऱ्या महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांशी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी संवाद साधला. आगामी कालावधीत टप्प्याटप्याने कामगार रवाना होतील. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा.

भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासात हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.