मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात मतदान सुरू झाले. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र न मिळाल्याने अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला. परंतु पोस्टमन सोमवारी सकाळी मतदार ओळखपत्र घेऊन घरी पोहोचल्यामुळे बहुसंख्य नवमतदारांना सोमवारी मतदानाचा हक्क बजावता आला.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी बहुसंख्य नवमतदारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या नवमतदारांना निवडणुकीपूर्वी ते मिळू शकले नाही. मतदानाचा दिवस उजाडला तरी ओळखपत्र न मिळाल्याने नवमतदारांचा हिरमोड झाला होता. मात्र अनेक नवमतदारांचे मतदान ओळखपत्र मंगळवारी सकाळी ७ ते ११ च्या सुमारास टपाल कार्यालयामार्फत घरपोच करण्यात आले. त्यामुळे या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आला.

हेही वाचा – उन्हाच्या झळा, तरीही मतदानासाठी रांगा; दक्षिण मध्य मुंबईतील धारावीत मतदानासाठी मोठ्या रांगा, पोलिसांचा फौजफाटा तैनात

मतदार ओळखपत्र मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नाव नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी मला माझा ईपीआयसी क्रमांक मिळाला. मात्र मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही असेच वाटले होते. परंतु टपाल कार्यालयाने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मतदान ओळखपत्र घरपोच केले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावता आला, असे नवमतदार आकांक्षा सकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा – मुंबई : लांब रांगा, मतदान यंत्रात बिघाड, वीजपुरवठा खंडित; विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा

निवडणूक आयोगाकडून टपाल कार्यालयांना प्राप्त झालेली मतदार ओळखपत्र २० मे रोजी दुपारी १२ पर्यंत मतदारांना सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार टपाल कार्यालयाला उपलब्ध झालेली नवमतदारांची मतदार ओळखपत्रे सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत, असे पोस्टमन दिनेश धाके यांनी सांगितले.