एमएमआरडीएने मु्ंबईत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील वाहतुक आराखडा यावर चर्चा करत तो अंतिम केला जाणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी मुंबई महानगर मध्ये सुरु असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या वाहतुकीच्या प्रकल्पांबाबत तसंच भविष्यातील प्रकल्पांबाबत एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं.

यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पांबाबत तुम्ही अभ्यास केला आहे ना ? अशी विचारणा मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. “अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे”, असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. कर्तव्य पार पाडताना राजकारण करु नये, राजकारण येऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

“जगात अनेक सुविधा सुरु होतात ज्या इथे नसतात. पण स्वयंचलित लोकल सेवा ही याआधीच आपल्याकडे आहे. प्लॅटफॉर्मवरुन लोकलमध्ये ऑटोमेटिक चढणे आणि स्टेशन आल्यावर तसंच ऑटोमेटिक उतरणे हे जगात कुठेही नाहीये “, असं मिश्किलपणे सांगत ३०-३५ वर्षांपूर्वी बेस्ट बस आणि लोकलने केलेल्या प्रवासाच्या आठवणी मुख्यमंत्री यांनी सांगितल्या.