लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : अकरावी प्रवेशापाठोपाठ आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रकही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार २१ मेपासून सकाळी ११ वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात १ हजार ४ आयटीआय आहेत. त्यात ४१८ सरकारी आणि ५८६ खासगी संस्था आहेत. सरकारी व खासगी संस्थांमध्ये मिळून राज्यभरामध्ये १ लाख ५७ हजार ६६४ जागा आहेत. या जागांमध्ये सरकारी संस्थांमध्ये ९७ हजार ८८ तर खासगी संस्थांमध्ये ६० हजार ५७६ आहेत. या जागांसाठी संचालनालयामार्फत २१ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती करणे, शुल्क भरणे तसेच मूळ कागदपत्रांची अर्ज स्विकृती केंद्रांत जाऊन तपासणी करून अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया २१ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याच्या प्रक्रियेला १ जून राजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २१ मेपासून सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयाेजित करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे इयत्ता १० वीची गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यानंतर आयटीआय प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. आयटीआय संस्था व संकेतस्तळावर प्रवेश प्रक्रियेचे जाहीर करण्यात येणारे वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे, असेही संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शंका निरसनासाठी मदत कक्ष उपलब्ध
प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व अन्य काही शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी आयटीआय संस्थेशी संपर्क साधावा अथवा संबंधित जिल्हा, प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा.
प्रवेशासाठी शुल्क
प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
विभागनिहाय उपलब्ध जागा
विभाग – सरकारी- खासगी
अमरावती – १७३०० – ३९२८
छत्रपती संभाजी नगर – १५८५६ – ८५०४
मुंबई – १६१९२ – ४५१२
नागपूर – १४९९६ – १४१८०
नाशिक – १५२२८ – १५४४०
पुणे – १७५१६ – १४०१२
