मुंबई : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेच्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली फेरी ६ ऑगस्ट, तर दुसरी फेरी १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया २२ ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणार आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या मात्र अद्याप प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ ते ७ ऑगस्टदरम्यान https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जातील आवश्यक बदल किंवा हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवारांनी ९ ते १० ऑगस्टदरम्यान आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून संबंधित आयटीआय व शाखेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ११ ऑगस्टपर्यंत संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची वेळ जाहीर केली जाईल. त्यानंतर १२ व १३ ऑगस्ट रोजी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष समुपदेशन होऊन गुणवत्ता, उपलब्ध जागा व पात्रतेच्या आधारे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. याशिवाय १७ ते २२ ऑगस्टदरम्यान संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २ ते ७ आयोजित करण्यात येणार आहे.

वेळापत्रक असे

  • अर्जातील माहिती दुरुस्ती – ६ ते ७ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) – समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध – ८ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजता) – समुपदेशन फेरीसाठी नोंदणी – ९ ते १० ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) – संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची तारीख/वेळ जाहीर – ११ ऑगस्ट (सकाळी ११ पर्यंत)
  • संस्थास्तरीय समुपदेशन फेरी व जागा वाटप – १२ ते १३ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) – मूळ कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेश – १२ ते १३ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्र. २ ते ७ चे वेळापत्रक

  • उमेदवारांची प्रत्यक्ष हजेरी नोंदणी – १७ ते २२ ऑगस्ट (दररोज सकाळी ८ ते दुपारी ११ वाजेपर्यंत)
  • संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध – १७ ते २२ ऑगस्ट (दररोज दुपारी १२ वाजता)
  • समुपदेशन व जागावाटप – १७ ते २२ ऑगस्ट (दुपारी १ पासून अंतिम उमेदवारापर्यंत)