मुंबई : राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेवरही झाला आहे. केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत जागा मिळालेल्या ७८ हजार ४९६ विद्यार्थ्यांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ २९ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. प्रवेश निश्चितीसाठी मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत मुदत देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे.

यंदा राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकूण १ लाख ४५ हजार ४० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख ३३ हजार ६२९ जागा केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीत एकूण ७८ हजार ४९६ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यापैकी अवघ्या ३६.९८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे ४९ हजार ४७२ विद्यार्थी अद्याप प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ६४ हजार ४२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून असून त्यापैकी २३ हजार ११२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. खासगी संस्थांमध्ये १४ हजार ७६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून त्यापैकी ५ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शासकीय संस्थांमधील प्रवेश निश्चितीचे प्रमाण ३५.८८ टक्के, तर खासगी संस्थांमधील प्रमाण ४२ टक्के आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रवेश निश्चितीची मुदत संपणार आहे. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.