मुंबई : पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असताना राज्यातील आयटीआयमध्ये यंदाच्या प्रवेशांत घट झाली आहे. या वर्षी आतापर्यंत आयटीआयसाठी १ लाख २६ हजार १४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशसंख्येत ४ हजार ५९९ ने घट झाली आहे. २०२५ मध्ये १ लाख ३० हजार ७४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे एकूण प्रवेशाचे प्रमाण ८६.७८ टक्क्यांवरून ८४.३५ टक्क्यांवर घसरले आहे.
राज्यातील सरकारी व खासगी आयटीआय मिळून यंदा १ लाख ४९ हजार ५४३ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १ लाख २६ हजार १४६ जागांवर प्रवेश झाले असून २३ हजार ३९७ जागा अद्याप रिक्त आहेत. यंदा एकूण उपलब्ध जागांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा १,११७ ने कमी झाली असतानाही प्रवेशात घट झाली आहे. गतवर्षी १ लाख ५० हजार ६६० जागांपैकी १ लाख ३० हजार ७४५ जागांवर प्रवेश झाले होते व १९ हजार ९१५ जागा रिक्त राहिल्या होत्या. म्हणजेच यंदा रिक्त जागांचा आकडा तब्बल ३,४८२ ने वाढला आहे.
सरकारी संस्थांच्या ९६ हजार ९६३ जागांपैकी ८९ हजार १८५ प्रवेश झाले आहेत. म्हणजेच ७,७७८ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी ९६ हजार ९३६ जागांपैकी ९० हजार १०६ प्रवेश झाले होते व ६,८३० जागा रिक्त होत्या. यंदा सरकारी आयटीआयमधील प्रवेश ९२१ ने कमी झाले असून रिक्त जागांमध्ये ९४८ ने वाढ झाली आहे. तर खासगी संस्थांमधील ५२ हजार ५८० जागांपैकी ३६ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे १५ हजार ६१९ जागा रिक्त आहेत.
गेल्या वर्षी खासगी संस्थांमध्ये ५३ हजार ७२४ जागांपैकी ४० हजार ६३९ प्रवेश झाले होते आणि १३ हजार ८५ जागा रिक्त होत्या. खासगी संस्थांमधील प्रवेश यंदा ३,६७८ ने कमी, तर रिक्त जागा २,५३४ ने वाढल्या आहेत. खासगी संस्थांमध्ये प्रवेश कमी झाल्यामुळे खासगी आयटीआयमधील संस्थास्तरीय व अल्पसंख्याक जागांवरील प्रवेशासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित जागा भरण्यासाठी संस्थांकडे आता शेवटची संधी आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत माहिती डॅशबोर्डवर देण्यात आली आहे.
राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे यापूर्वीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले होते.
२०२६ विरुद्ध २०२५
| प्रवेशाची स्थिती | २०२६ | २०२५ | बदल |
|---|---|---|---|
| उपलब्ध जागा | १,४९,५४३ | १,५०,६६० | १,११७ |
| झालेले प्रवेश | १,२६,१४६ | १,३०,७४५ | ४,५९९ |
| रिक्त जागा (तूट) | २३,३९७ | १९,९१५ | ३,४८२ |
| प्रवेशाचे प्रमाण | ८४.३५ टक्के | ८६.७८ टक्के | २.४३ टक्के |
