मुंबई : जे. जे. रुग्णालयातील मोठय़ा प्रमाणात औषध तुटवडा का निर्माण झाला याचा तपास करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दोन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. तसेच भविष्यात पुन्हा औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी नवीन पद्धती येत्या आठवडय़ापासून राबविण्यात येणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांच्या रांगा पुन्हा सुरू झाल्या आहेत. करोनाकाळात पुढे ढकलेल्या शस्त्रक्रियाही आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे औषधांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, परंतु औषधांचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी अधिवेशनातही पडसाद उमटले. त्यानंतर या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी करोनाकाळात प्रतिनियुक्ती म्हणून बदली केलेल्या डॉ. पल्लवी सापळे यांची पुन्हा अधिष्ठातापदी रुजू होण्याचे आदेश वैद्यकीय संचालनालयाने दिले. त्यानुसार डॉ. सापळे यांनी ही सूत्रे हाती घेतली आहेत.
औषध तुटवडा का निर्माण झाला याची तपासणी करण्यासाठी दोन सदस्याची समिती नियुक्त करण्यात आली आहे. याचा अहवाल काहीच दिवसांत येण्याची शक्यता आहे. परंतु भविष्यात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी येत्या आठवडय़ापासून रुग्णालयात नवीन पद्धती लागू केली जाणार आहे.
औषधे, शस्त्रक्रियेसासाठी लागणारी सामग्री आणि विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी लागणारे संच, प्रत्येक भांडारातील उपलब्ध साठा आणि पुढील महिन्यासाठी आवश्यक साठा याच्या नोंदी प्रत्येक महिन्याला घेतल्या जातील. पुढील महिन्यासाठी आवश्यक साठा नसल्यास तातडीने मागविला जाईल. हाफकिन संस्थेमार्फत औषध साठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय प्रशासन पातळीवर त्याची खरेदी केला जाईल, परंतु पुढील महिन्याचा साठा आधीच करून ठेवण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात आली आहे. याचा पाठपुरावा सातत्याने केला जाईल. या पद्धतीची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. त्यामुळे निर्माण झालेला हा तुटवडा लवकर भरून काढला जाईल, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.