मुंबई : ‘मार्ड’च्या आरोपांमुळे व्यथित होऊन मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने, नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी बुधवारी राजीनामे दिले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून, निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, शैक्षणिक अनियमितता, शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम, निवासी डॉक्टरांवर अश्लील भाषेत टिप्पणी आदींमुळे जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. डॉ. पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करावी, तसेच आवश्यक पदांवर प्राध्यापकांची लवकरात लवकर भरती करावी, अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.
‘मार्ड’ने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा करीत डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्याचबरोबर विभागातील अन्य आठ डॉक्टरांनीही राजीनामा दिला आहे. त्यात डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता यांचा समावेश आहे.
सध्या कार्यरत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या २८ निवासी डॉक्टरांनी ‘मार्ड’ संघटनेमार्फत या प्रकरणी २२ मे २०२३ रोजी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचे स्पष्टीकरण अधिष्ठात्यांनी नेत्रविभाग प्रमुखांकडे मागितले. परंतु, स्पष्टीकरण देण्यापूर्वीच अधिष्ठात्यांनी चौकशी समिती नेमली. या समितीमध्ये महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी चौकशी केलेल्या डॉ. अशोक आनंद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. अशोक आनंद यांनी डॉ तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. अभिचंदानी यांच्याविरुध्द अॅट्रॉसीटीअंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी अन्य डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी विनंती करण्यात आली. परंतु, अधिष्ठात्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही नियुक्ती आकसाने आणि बदनामी करण्याच्या हेतूने केल्याचा आरोप डॉ. तात्याराव लहाने यांनी केला. सर्व अध्यापक मानसिक तणावाखाली वावरत असून, आमच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे विभागातील सर्व अध्यापकांनी ३१ मे रोजी राजीनामा देऊन स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले. दरम्यान, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत’, असे जे.जे. रुग्णालयातील ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. शुभम सोनी यांनी सांगितले.
मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, त्याचे पुरावे आहेत. आमच्याविरोधातील तक्रारींबाबत निष्पक्षपणे चौकशी व्हावी. –डॉ. रागिणी पारेख
डॉक्टरांचे राजीनामे अद्याप माझ्याकडे आलेले नाहीत. ते प्राप्त झाल्यास त्यावर शासकीय नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.-डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय