मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कबुतरखाने, जैन धर्म, मराठी- गुजरातीचा भाषिक वाद शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून निर्माण केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना आवर घालावा, असे सांगत जैन मुनींनी शनिवारी धर्मसभेत आक्रमक भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व प्रांत व धर्माच्या संतांनी घरोघरी जाऊन प्रचार केला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा दावाही जैन मुनींनी केला.

दादर येथील योगी सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत जैन मुनींनी आक्रमक भूमिका घेत अनेक वादग्रस्त विधाने केली. यापूर्वी कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार गेले होते. आता कबुतरामुळे कोणाकोणाची सत्ता जाईल, हे देवालाच माहीत, असाही इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला.

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आल्याने जैन समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसादही या धर्मसभेत उमटले. जैन समाजाने शिंदेंना ठाण्यात साथ दिली, आनंद दिघेंच्याही पाठीशी उभे राहिलो होतो. मात्र आताचे शिवसेना नेते पालिका निवडणुकीसाठी कबुतरखाने, जैन धर्म यांवरून वाद निर्माण करत आहेत. अशा नेत्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवर घालावा, असे जैन मुनी म्हणाले.

जैन समाज शांतीप्रिय आहे. सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. सर्वाधिक रुग्णालये जैन समाजाने उभारली आहेत. उद्योग- व्यापारात मारवाडी आणि गुजराती समाजासह जैन समाज पुढे आहे. हा समाज देशाची उन्नती करणारा आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांना सहाय्यता निधीतून २ कोटी रुपयांचा धनादेश जैन समाजाने दिला, तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. आमचे काही संतही राजकारण करू लागले आहेत. त्यामुळे आम्ही स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरही यावेळी ताशेरे ओढण्यात आले.

नव्या पक्षाची स्थापना

बाळासाहेब ठाकरे यांनी माता जगदंबेच्या आशीर्वादाने शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे शिवसेना मोठी झाली. आताच्या शिवसेनेबद्दल माहिती नाही. त्या काळी शिवसेनेचे चिन्ह माता जगदंबेचे वाहन वाघ होते आणि आता आमच्या जैन समाजाचे चिन्ह शांतिदूत कबुतर आहे. आज आम्ही ‘शांतिदूत जनकल्याण पक्ष’ स्थापन करत आहोत, अशीही घोषणा निलेशचंद्र यांनी केली.

हा केवळ जैन समुदायाचा पक्ष नसेल. देशातील प्रत्येक समुदायाचा पक्ष असेल आणि महापालिकेच्या प्रत्येक विभागात आम्ही आमचे वाघ लढायला पाठवू, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचा पक्ष सर्व प्राणिमात्रांसाठी लढेल. मी कोणत्याही पक्षाचा विरोध करत नाही. मी महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच मानतो. त्याशिवाय मी कोणालाही मानत नाही, असे निलेशचंद्र यांनी स्पष्ट केले.

‘डॉक्टरांना मूर्ख समजतो’

कबुतरांशी कोणालाही काहीही घेणेदेणे नाही. त्यांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या रोगाशीही देणेघेणे नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तरीही कोणाला फरक पडत नाही. दररोज एक नव्हे, तर हजारो- लाखो जणांचे निष्पाप मृत्यू होतात. मात्र त्यांच्याविषयी कोणीही विचार करत नाही. कबुतर हा केवळ बहाणा आहे. राजकारणासाठी त्याचा हत्याराप्रमाणे वापर केला जात आहे. एखाद्या माणसाचा अंगावर झाडाचे पान पडून मृत्यू झाल्यास ते मान्य कराल का, हा मूर्खपणा आहे. त्याचप्रमाणे कबुतरांच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? कबुतरांमुळे रोग पसरत असल्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना मी मूर्ख समजतो, असे वादग्रस्त विधान जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी केले.

वादग्रस्त विधाने

  • कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. डॉक्टरांकडे याबाबत उपचार उपलब्ध नाहीत. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्याल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते.
  • सत्ताधाऱ्यांना सर्व साधुसंतांनी राजसत्तेत बसविले आहे. त्यामुळे धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा वरचढ आहे, याची राजकारण्यांना जाण असायला हवी.
  • कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागले तर तेही करू.