लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विलेपार्ले येथील जैन मंदिराच्या पाडकामानंतर महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत संबंधित महानगरपालिका कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी मंदिरावर कारवाई केली. मात्र, राजकीय वातावरण तापल्यानंतर त्याच अधिकाऱ्याची पालिकेने तडकाफडकी बदली केली. पालिकेच्या या कृत्यामुळे अभियंत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या के पूर्व कार्यालयावर बुधवारी निदर्शने केली. तसेच, कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध केला.

विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ सोसायटीच्या आवारातील जैन मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नगर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही मंदिराचा वाद पोहोचला होता. अखेर मंदिर अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यांनतर १६ एप्रिल रोजी मंदिर पाडण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र पालिकेने न्यायालयात दिले होते. त्यानुसार १६ एप्रिल रोजी मंदिराचे पाडकाम करण्यात आले. मात्र, या घटनेननंतर जैन समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला. पालिकेच्या या कारवाईविरोधात शनिवारी विलेपार्ले परिसरात मोठ्या संख्येने जैन बांधव एकत्र आले आणि त्यांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्याला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने प्रकरण वाढले.

राजकीय दबाव वाढल्यामुळे महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, मंदिरावर कायद्यानुसार कारवाई करूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पदभार काढून घेतल्यामुळे पालिका कर्मचारी संतप्त झाले. महापालिका आयुक्तांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे, अशी भावना अभियंत्यांनी व्यक्त केली.

घाडगे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखी आहे, असे मत म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने व्यक्त केले. नवनाथ घाडगे यांची बदली केल्यामुळे बुधवारी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन व म्युनिसिपल मजदूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने कारण्यात आली. के पूर्व विभाग कार्यालयाचा परिसर कामगार, कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजीने दणाणून सोडला. भविष्यात पुन्हा अशी एखादी घटना घडली, तर महानगरपालिका आयुक्तांनी ठामपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.