मुंबई : बहुप्रतिक्षित जळगाव ते दिल्ली दरम्यानचा प्रवास अवघ्या तीन तासांवर आणणारी विमान सेवा सुरु होण्यापूर्वीच नागरी विमान महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मंजुरी अभावी रखडली आहे. अलायन्स एअरद्वारे शनिवार,२ मे पासून जळगाव ते दिल्ली दरम्यान विमान सेवा चालविण्यात येणार होती. सुरु होण्यापूर्वीच विमान सेवा रखडल्याने जळगावच्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
जळगावमधून दिल्लीकरिता विमानसेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. जळगाव ते दिल्ली व्हाया इंदूर विमान सेवा सुरु झाल्याने व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने आग्रह धरला होता. अखेरीस, अलायन्स एअरने २ मेपासून ही सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, एअरलाइनने उड्डाणांचे वेळापत्रक प्रसिद्ध करत तिकीट विक्रीही सुरू केली. विमान सेवा सुर होणार असल्याच्या घोषणेने जळगावचे रहिवासी आनंदित झाले होते.
१७ तासांचा प्रवास ३ तासांवर
या विमान सेवेचा फायदा केवळ जळगावलाच नव्हे, तर धुळे आणि बुलढाणा या शेजारच्या जिल्ह्यांसह विदर्भालाही होण्याची अपेक्षा होती. सध्या, रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी १५ ते १७ तास लागतात. जळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू झाल्याने हा प्रवास केवळ तीन तासांवर आला असता.
डीजीसीएची मंजुरी नाही
जळगाव-दिल्ली विमानसेवेसाठी नियोजित उड्डाणापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी उड्डाणात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने एअरलाइनला नागरी विमानन महासंचालनालयाकडून (डीजीसीए) आवश्यक तांत्रिक मंजुरी अद्याप अधिकृतपणे मिळालेली नाही. तसेच, विमानांची कमतरता हे देखील विलंबाचे कारण असल्याचे समजते. किमान तीन आठवड्यांनंतरच ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव-इंदूर-दिल्ली विमानसेवेचे वेळापत्रक
आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीहून दुपारी ४.५० वाजता उड्डाण करणारे विमान इंदूर येथे सुमारे २५ मिनिटे थांबून रात्री ७.५५ वाजता जळगाव येथे दाखल होणार होते. त्यानंतर जळगावहून रात्री ८.२० वाजता उड्डाण घेऊन तेच विमान इंदूरमार्गे दिल्लीला रात्री ११.२० वाजता पोहोचणार होते. या सेवेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट राजधानीशी हवाई जोडणी मिळणार असल्याने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
