मुंबई : विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार सुरेंद्र उर्फ  बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. माने हे उद्या, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवत आहे. आघाडीत १७ पैकी १५  जागांवर एकमत झाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला  रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना अशा चार जागा आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाकरे गटाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून सुरेंद्र माने यांची उमेदवारी निश्चित केली. माने हे मूळ भाजपचे आहेत. १९९९ मध्ये ते रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाने त्यांना तेव्हा रत्नागिरीमधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान,  ठाकरे गटाकडून जळगाव, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या तीन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिली.