मुंबई : खार येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी जान्हवी कुकरेजा हिच्या खून प्रकरणातील सहआरोपी आणि तिची मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष सुटकेला जान्हवीच्या आईने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
निधी कुकरेजा यांनी वकील त्रिवनकुमार करनानी यांच्यामार्फत केलेल्या अपिलानुसार, दिया हिची निर्दोष सुटका ही खटल्यादरम्यान नोंदीवर आलेल्या पुराव्यांविरोधात जाणारी आणि केवळ निराधार व अतार्किक गृहितकांवर आधारित असल्याचा दावा केला आहे. पाच वर्षांपूर्वी खार येथील ”भगवती हाइट्स” इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित पार्टीदरम्यान जान्हवी हिला तिचा प्रियकर श्री जोगधनकर याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत झालेली गंभीर दुखापत आणि रक्तस्राव यामुळे तिचा मृत्यू झाला. या मारहाणीत दिया हिने श्री याला साथ दिली होती, असा पोलिसांचा आरोप होता.
सत्र न्यायालयाने श्री याला त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, दिया हिची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती. दिया हिच्याबाबतच्या निर्णयाबाबत असमाधानी असलेली जान्हवी हिची आई निधी कुकरेजा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, दिया हिची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
सरकारी पक्षाने गुन्ह्याच्या ठिकाणी दिया हिची उपस्थिती सिद्ध केली असली तरीही गुन्ह्याच्या कृत्यात तिचा सहभाग संशयास्पद वाटतो. तिच्या ओठावर झालेल्या एका दुखापतीव्यतिरिक्त तिच्या शरीरावर इतरत्र कोणतीही दुखापत आढळली नसल्याचे सत्र न्यायालयाने दिया हिची निर्दोष सुटका करताना म्हटले होते. त्याचवेळी गुन्ह्याच्या ठिकाणी दिया हिची उपस्थिती आणि तिच्या व जान्हवीमध्ये झालेली झटापट ही सत्र न्यायालयाने मान्य केली होती. परंतु, या खुनामध्ये तिचा सक्रिय सहभाग आणि समान उद्देश असल्याचे सिद्ध करणारे पुरेसे परिस्थितीजन्य व न्यायवैद्यक पुरावे पूर्णपणे दुर्लक्षित करून सत्र न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केल्याचा दावा निधी यांनी अपीलात केला आहे.
दिया हिचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग वाजवी संशयापलीकडे सिद्ध करणाऱ्या अनेक साक्षी-पुराव्यांचाही विचार सत्र न्यायालयाने केला नसल्याचा दावा अपीलमध्ये करण्यात आला आहे.
घटनास्थळी दिया हिच्या वस्तू सापडल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय, दिया पलंगावर झोपली होती, त्यावर जान्हवीचे रक्त आढळल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातूनही दिया हिचा या हल्ल्याशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते, असा दावा देखील निधी यांनी प्रामुख्याने केला आहे.
