मुंबई : पाच वर्षांपूर्वी खार येथील ”भगवती हाइट्स” या इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित पार्टीच्या वेळी जान्हवी कुकरेजा या महाविद्यावयीन तरूणीच्या झालेल्या खुनाप्रकरणी सत्र न्यायालयाने तिचा मित्र श्री जोगधनकर याला शनिवारी त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवले व त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, जान्हवीची मैत्रीण दिया पाडळकर हिची मात्र न्यायालयाने पुराव्यांअभाावी निर्दोष सुटका केली.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबर २०२० रोजी ”भगवती हाइट्स”च्या गच्चीवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्रभर ही पार्टी चालणार होती. या पार्टीमध्ये जान्हवी, श्री, दिया यांच्यासह इमारतीमध्ये राहणारे तसेच त्यांचे मित्रमंडळी सहभागी झाले होते. तथापि, मध्यरात्री म्हणजेच १ जानेवारी २०२१ रोजी १९ वर्षांच्या जान्हवी हिला श्री जोगधनकर आणि दिया पाडळकर यांनी बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला, असा आरोप होता. सत्र न्यायालयाने शनिवारी या प्रकरणी निकाल देताना जोगधनकर याला त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर दियाची निर्दोष सुटका केली. जान्हवीची शेजारी आणि बालपणीची मैत्रीण असलेली दिया जामिनावर बाहेर असून जोगधंकर अजूनही तुरुंगात आहे.

फिर्यादी पक्षाच्या आरोपांनुसार, १ जानेवारी २०२१ रोजी पहाटे जान्हवी इमारतीच्या जिन्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. मानसशास्त्राची विद्यार्थिनी असलेली जान्हवी सांताक्रूझ येथे आईवडिलांसह राहायची. खार येथील इमारतीच्या टेरेसवरील पार्टीत सहभागी झाल्यानंतर जिन्यात जान्हवीवर हल्ला करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून दिया (२३) आणि जोगधनकर (२६) यांना अटक करण्यात आली होती. जोगधनकर याच्या दियाशी असलेल्या जवळकीवरून जान्हवीचे त्याच्याशी भांडण झाले होते. त्यानंतर, त्याने आणि दियाने तिला मारहाण केली. नंतर, जोगधनकर याने जान्हवीला पाचव्या मजल्यावरून जिन्यातून केस धरून खाली खेचत आणले. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. जान्हवीच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर ४८ जखमा झाल्याचे आढळून आले.

निर्दोष असल्याचा दावा अमान्य

आपण निर्दोष असल्याचा दावा जोगधनकर याच्यातर्फे करण्यात आला होता. तसेच, फिर्यादी पक्षाचा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे आणि त्यात कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. याशिवाय, फिर्यादी पक्ष कायद्यानुसार आवश्यक असलेली पुराव्यांची संपूर्ण साखळी सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. जोगधनकरला झालेल्या जखमा या तात्काळ झालेल्या भांडणामुळे झाल्या होत्या, असा दावा देखील त्याच्यातर्फे वकील वहाब खान यांनी युक्तिवादाच्या वेळी केला होता.

परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित खटला

फिर्यादी पक्षाचा खटला प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. त्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रिकरण आणि न्यायवैद्यक अहवाल न्यायालयात सादर केले होते. याशिवाय, ४९ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. जोगधनकर फाटलेल्या शर्टवर रक्ताचे डाग लागलेल्या अवस्थेत आणि गोंधळलेल्या मनःस्थितीत इमारतीतून बाहेर पडताना दिसला होता, तर दिया हिने गुन्ह्याच्या वेळी झालेल्या ओठांच्या दुखापतीवर वैद्यकीय उपचार घेतल्याचा आरोप आहे, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवादाच्या वेळी न्यायालयाला सांगितले. न्यायवैद्यक अहवालानुसार, जोगधनकरच्या शर्टवर आणि दिया हिने वापरलेल्या वस्तूंवर जान्हवी हिचे रक्त असल्याची पुष्टी झाल्याचेही घरत यांनी न्यायालयाला सांगितले होते. दुसरीकडे, जान्हवीची आई निधी यांनी देखील या प्रकरणी हस्तक्षेप अर्ज केला होता. त्यात त्यांनी आपल्या मुलीची हत्या क्रूर आणि अमानुषपणे करण्यात आल्याचे आणि दोषींना शिक्षा सुनावून तिला न्याय देण्याची मागणी केली होती.