मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनातील भाषेवरून संपूर्ण जेन-झीचे मूल्यमापन करणे चुकीचे असून ती मूठभर अशा भ्रमिष्ठांची (भ्रमित-दिशाभूल झालेले) भाषा आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सह-संयोजक डॉ. राजेश्वर कुमार पराशर यांनी नीट पेपरफुटीवरून झालेल्या आंदोलनाचा आणि त्यात तरूणांनी केंद्र सरकारवर टीका करताना वापरलेल्या भाषेचा समाचार घेतला.
जेन झीने या आंदोलनात जी भाषा वापरली ती मूठभर लोकांचे प्रतिनिधित्त्व करते. तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांना दिशाभूल केले गेले होते. त्यामुळे ती भ्रमिष्ठांची भाषा म्हणायला हवी. विकसित भारताचे ध्येय्य साध्य करायचे असेल तर तरूणांमध्ये कर्तव्यभावना आणि नागरी तत्त्वे रूजायला हवी. आपण भलेही बुलेट ट्रेन आणू. पण, त्यात कुणीतरी थुंकून ठेवत असेल, तर काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला.
तरूणांनी जी भाषा वापरली त्यावरून समाजात चिंतन व्हायला हवे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि भावनिक बुद्धिमत्ता (ईआय) यांत संतुलन साधत तरूणांशी सतत संवाद साधणे आवश्यक आहे, अशी गरज पराशर यांनी व्यक्त केली.
संघ विचारांच्या प्रेरणेने चालविल्या जाणाऱ्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यासतर्फे शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील एनएसई येथे शनिवारी शिक्षणावरील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. २०४७मध्ये विकसित भारताचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर शिक्षणाची दिशा काय हवी, हा या परिषदेचा विषय होता. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या परिषदेचा गोषवारा पराशर यांनी पत्रकारांना दिला.
शिक्षणावर सहा टक्के खर्च मोठ्या देशांनाच शक्य
तरूणांची रोजगारक्षमता वाढविणे, सामाजिक उत्तरदायीत्त्वाच्या माध्यमातून उद्योगांना शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करणे, प्राचीन भारतीय ज्ञानसंपदा विज्ञान, सामाजिक शास्त्रांतून अधोरेखित करणे, तरूणांशी, विद्यार्थ्यांशी पालकांनी, शिक्षकांनी दृढ संवाद साधणे या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा केल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या तीन टक्क्यांच्या आसपास घुटमळणारा शिक्षणावरील खर्च सहा टक्के या आदर्श पातळीवर नेण्याबाबत परिषदेत चर्चा झाली का, अशी विचारणा केली असता पराशर यांनी, शिक्षणावर सहा टक्के खर्च करणे हे केवळ अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनाच शक्य होते. परंतु, भारतासारख्या देशाला इतर बाबींना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे आपण इतका खर्च करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
जीडीपी नव्हे आध्यात्मिक विकास महत्त्वाचा
शिक्षणाचा मूळ हेतू हा शाश्वत विकासाचा असला पाहिजे. परंतु, आपल्याकडे विकास सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) अनुषंगाने मोजला जातो. जीडीपी केवळ भौतिक आणि आर्थिक विकासाची माहिती देतो. परंतु, आध्यात्मिक विकासाबाबत आपल्याकडे बोलले जात नाही. ते काम शिक्षणाने केले पाहिजे, अशी अपेक्षा न्यासाच्या अध्यक्ष पंकज मित्तल यांनी व्यक्त केली.
शिक्षण प्रणालीने सांस्कृतिक मुळांशी जोडलेले असावे
विकसित भारत चारित्र्यवान, सुसंस्कृत, सक्षम आणि स्वावलंबी नागरिकांच्या निर्मितीतून घडणार आहे. भारतीय शिक्षण प्रणालीने आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहूनच आधुनिक विज्ञान, नवोपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या दिशेने पुढे जायला हवे. शिक्षण, उद्योग, सरकार आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच २०४७ पर्यंत विकसित भारताचा राष्ट्रीय संकल्प साकार होऊ शकतो, अशा शब्दांत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी परिषदेत मार्गदर्शन केले.
