मंत्री नवाब मलिक आणि जास्मिन वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. करोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे देखील नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. यावरून जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

मी नवाब मलिक यांचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का, असा इशारा जास्मिन वानखेडे यांनी दिलाय. मात्र, ऑस्ट्रेलिया वर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन, असं त्या म्हणाल्या. तसेच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असंही यास्मिन यांनी म्हटलं आहे.  

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर नव्याने काही आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सर्व वसुली मालदीवमध्ये झाल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले. ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.