कायद्याचे उल्लंघन करत जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात नऊ थर लावून सलामी दिली. ठाण्यातील नौपाडा येथे मनसेकडून उभारण्यात आलेल्या ‘कायदेभंग’  हंडीसाठी ११ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.  याच मंडळाने दहीहंडीच्या मर्यादेवर घातलेल्या निर्बंधाविरोधात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी फेरविचार याचिका दाखल केली होती.  मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे निर्बंध कायम ठेवत जय जवान पथकाची याचिका फेटाळून लावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असणाऱ्या पथकाने अखेर गुरुवारी नियमाचे उल्लंघन करत आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेला हा पवित्रा त्यांना महागात पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारुन नऊ थरांची हंडी लावल्यानंतर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. न्यायालयाचे आदेशाची पायमल्ली करुन हंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या गोविंदा पथकांवर  कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने कायम केले आहेत. दहीहंडीच्या उत्सवावर न्यायालयाने लादलेले निर्बंध धुडकावून लावत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  ठाण्यात ४० फुटी दहीहंडी उभारली होती. मात्र पोलिसांनी समज दिल्यानंतर ही हंडी २० फुटावर घेण्यात आली होती. सध्या दहीहंडीच्या ठिकाणी  गणवेशातील आणि साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच पोलिसांकडून वेळ पडल्यास न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी या दहीहंडीच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी केली जात आहे.