अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. एनसीबीने चौकशीदरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्स अॅप चॅट समोर दाखवले आणि सीबीडी ऑईलबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते चॅट खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑईल पुरवल्याची कबुली जयाने दिली. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे.

श्रद्धा कपूरशिवाय तिने सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासा जयाने केला. अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबतच्या चॅटबद्दल प्रश्न विचारला असता तिने ते चॅट तिचे असल्याची कबुली तर दिली पण त्याबद्दल काहीच आठवत नसल्याचं सांगितलं.

याआधी ईडीने रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांच्यातील व्हॉट्स अॅप चॅट समोर आणले होते. त्या चॅटमध्ये दोघी ड्रग्सबद्दल बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. “चहामध्ये चार थेंब टाक, ते त्याला प्यायला दे. ३० ते ४० मिनिटांत त्याचा परिणाम जाणवू लागेल”, असे जयाने रियाला चॅटमध्ये म्हटले होते. त्या दोघी सीबीडी ऑईलबद्दल बोलत आहेत हे नंतर चौकशीतून स्पष्ट झालं.

एनसीबीने जया साहाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलविषयीचा तपास एनसीबी करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहने पार्टी केल्याची माहिती तिथल्या एका बोटचालकाने एनसीबीला दिली होती.

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचंही नाव समोर आलं आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिलासुद्धा एनसीबीने समन्स बजावले आहेत. मात्र आजारपणाचं कारण देत तिने २५ सप्टेंबरपर्यंतची वेळ एनसीबीकडे मागितली आहे. करिश्मा जया साहासोबत Kwan टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये काम करते. दीपिकालाही एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता आहे.