मुंबई : जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ च्या कामासाठी ६ हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ ही पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. यामुळे ४५४ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेचे माजलगाव धरण अस्तित्वात येणार आहे. यावर माजलगांव (लोणी सावंगी) उपसा योजना, साळींबा ठिबक उपसा योजना, शिरस मार्ग निम्नपात्री बंधारा, रोशनपुरी उच्चपातळी बंधारा व १४८ किलोमीटर लांबीचा माजलगाव उजवा कालवा व त्यावरील गल्हाटी, धोंड, उकडगांव, मुरंबी, पेंडू, सुभाषनगर हे ६ मार्गस्थ जलाशय तसेच माजलगाव मासोळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम समाविष्ट आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आलेले असून, पहिल्या टप्प्यातील जायकवाडी धरण, जायकवाडी प्रकल्पाचा २०८ किमी लांबीचा पैठण डावा कालवा, त्यावरील शाखा कालवे, वितरिका, उप व लघु वितरिका या घटकांचे काम पूर्ण झालेले असून, टप्पा दोन हा मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या टप्पा – २ ला ६ हजार ४७७.८८ कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण आणि माजलगाव उजवा कालव्याशी संबंधित कामे होणार आहेत.

या प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत पैठण उजवा कालवा ८६०.२३ कोटी, माजलगाव धरण (उर्वरित कामे) १२२३.४५ कोटी रुपये तर माजलगाव उजवा कालव्याच्या ४,३९४.२० कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. टप्पा दोन प्रकल्पांतर्गत पैठण उजवा कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगरमधील १,७३२ हेक्टर, अहिल्यानगरमधील १,६९० हेक्टर व बीडमधील ३८,२६० हेक्टर, असे एकूण ४१,६८२ हेक्टर व माजलगाव उजवा कालव्याद्वारे बीड २९,१०५ हेक्टर, परभणीतील ४४,४०८ हेक्टर व नांदेडमधील ११,३३७ हेक्टर, असे एकूण ८४,८५० हेक्टर आणि साळींबा ठिबक उपसा सिंचन योजनाद्वारे बीडमधील आणखी ५,१२० हेक्टर, असे या पाच जिल्ह्यांतील एकूण १,३१,६५२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.