मुंबई : सरकारचा ‘विकास’ काही ठिकाणी पुराच्या पाण्यात खेळताना दिसला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्य्यात तरंगताना दिसला. डोंगरावरून कोसळलेल्या दरडींवरून घसरगुंडी करताना दिसला. पडलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये लंपडाव खेळताना दिसला, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील गुरुवारी विधानसभेत केली.

अतिवृष्टीनंतर राज्यभरात निर्माण झालेल्या स्थितीवरून विरोधी पक्षांतील नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. साडेसात हजार कोटी रुपये करून उभारण्यात आलेला मिसिंग लिकमध्ये डोंगराचा काही भाग कोसळला. सात – आठ देशांकडून सल्ला घेतला. जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याचा दावा केला जातो. मग, मिसिंग लिंकवरील डोंगराचे परिक्षण का केले नाही.

पहिल्याच पावसात, असा अनुभव आल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. सरकारने कुठल्याही गोष्टीचे समर्थन करू नये. मिसिंग लिंक बांधणाऱ्या विभागाचे सल्लागार, अभियंते यांचे अपयश आहे. दोषपूर्ण काम केलेल्यांवर ठपका ठेवणे, हे विरोधी पक्षाचे काम आहे. सरकारच्या पायाभूत सुविधांविषयी लोकांना शंका निर्माण होऊ लागली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केला.

राज्यात किती गुंतवणूक झाली ?

२०१८ पासून राज्यात किती गुंतवणूक आली, हे सरकारने सांगावे. राज्यात १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले जात होते, खरचं इतकी गुंतवणूक झाली का. मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी जागतिक निविदा काढा. अपात्र ठेकेदारांकडून मोठे प्रकल्प करू नका. पाऊस आणि ढगफुटीचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे, ती संभाव्य स्थिती गृहीत धरून आपण दर्जेदार बांधकाम करतो का?

रस्त्यांची आणि पुलांची इतकी वाईट अवस्था जगातील अन्य कोणत्याही देशात झालेली दिसत नाही. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसणार आहे. मुंबईने २०१६ ते २०२१ या काळात २,०२८ हेक्टर शहरी वृक्ष क्षेत्र कमी झाले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणारी कांदळवनांचे क्षेत्र वेगाने कमी होत आहेत. मिठागरांच्या जमिनी आपण सिमेंटच्या बांधकामासाठी कंत्राटदारांच्या घशात घातल्या आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.