मुंबई : महाराष्ट्राची कृषी उत्पादन क्षमता भक्कम आहे. आता कृषी क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील विकासासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता व्यवस्था, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या मूल्य साखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केले.
मुंबईत आयोजित ‘मॅग्नेट ॲग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’च्या समारोपाच्या सत्रात ते बोलत होते. या वेळी आमदार चरणसिंग ठाकूर, पणन सचिव प्रवीण दराडे, पणन संचालक तथा महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे व गुंतवणूकदार उपस्थित होते.
केळी, आंबा आणि लिंबूवर्गीय पिकाच्या क्षेत्रात शेतकरी पातळीवरील एकत्रीकरण व्यवस्था, प्राथमिक टप्प्यातील पायाभूत सुविधा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि थेट बाजारपेठेशी जोडणी मजबूत करण्याची गरज आहे. ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलला विशेष महत्व देण्यात आले. या मॉडेलमध्ये ‘स्पोक’ स्वरूपाच्या सुविधा शेतकरी पातळीवरील कृषी मालाचे एकत्रीकरण आणि प्राथमिक हाताळणी मजबूत करतील, तर ‘हब’च्या माध्यमातून आधुनिक प्रक्रिया, शीतसाठवणूक, मूल्यवर्धन आणि निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री रावल म्हणाले. या मेळाव्याला गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्रेते तसेच वित्तीय संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे रावल यांनी सांगितले.
बाजारपेठेच्या गरजेनुसार मूल्यसाखळी
मॅग्नेट २.० अंतर्गत सहा प्राधान्य समूह आणि आगामी ‘ईओआय’ प्रक्रियेत मेळाव्यातून मिळालेल्या सूचनांचा उपयोग करण्यात येणार असून, विकसित होणाऱ्या संधी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत आणि बाजारपेठेच्या मागणीशी जोडलेल्या राहतील, यावर भर दिला जाणार आहे. बाजारपेठेसाठी केवळ उत्पादन करण्याऐवजी बाजारपेठेच्या गरजेनुसार मूल्यसाखळी उभारली पाहिजे. केवळ कृषी मालाची निर्यात न करता गुणवत्तेची हमी असलेली आणि बाजारपेठेसाठी तयार उत्पादने निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. शासन, उद्योग, गुंतवणूकदार आणि शेतकरी यांनी भागीदार म्हणून एकत्रितपणे सक्षम कृषी-व्यवसाय परिसंस्था उभारली पाहिजे, असे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.
