जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल

आयआयटी आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून, चंदिगड येथील प्रणव गोयल हा देशात पहिला आला, तर मुंबई विभागात ऋषी अगरवाल याने बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के गुण मिळवून प्रवेशपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र जवळपास निम्म्याने कमी झाली आहे.

आयआयटी आणि इतर काही राष्ट्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स घेण्यात येते. देशातून पहिल्या आलेल्या प्रणव गोयल याला ३६० पैकी ३३७ गुण आहेत. ऋषी अगरवाल हा राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर आहे. देशात मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारख ही ३१८ गुण मिळवून प्रथम आली असून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ती सहाव्या स्थानावर आहे. मुंबई विभागात दुसऱ्या स्थानावर अभिनव कुमार (राष्ट्रीय यादीतील क्रमांक १२), सौम्या गोयल तिसऱ्या स्थानावर (राष्ट्रीय यादीतील क्रमांक १३) आहे. मुंबई विभागात मुलींमध्ये मेघना मिसुला हिने प्रथम क्रमांक (राष्ट्रीय यादीतील क्रमांक ८०) पटकावला आहे. देशभरातील २३ आयआयटीमधील ११ हजार २७९ जागांवरील प्रवेश या निकालाच्या माध्यमातून होणार आहेत. देशभरात २० मे रोजी ही परीक्षा झाली होती. यंदा जेईई मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेले साधारण १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटली

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत ३५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरवण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून घेण्यात आला. त्यानुसार सामाईक प्रवेश यादीत ३६० पैकी १२६ गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरले. यंदा या निकषानुसार परीक्षेला बसलेल्या दीड लाख विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १३८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा ३५ टक्के गुण मिळवून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून गेल्या वर्षी साधारण ३० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.

मुलींसाठी आठशे जागा राखीव

आयआयटीमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार यंदा आठशे जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या मुलींची संख्या २ हजार ७६ आहे, तर मुलांची संख्या १६ हजार ७६ आहे. यंदा खुल्या गटातील ८ हजार ७९४ विद्यार्थी, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून ३ हजार १४० विद्यार्थी,अनुसूचित जातींमधून (एससी) ४ हजार ७०९ विद्यार्थी तर अनुसूचित जमातींमधून (एसटी) १ हजार ४९५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.