मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड २०२६ चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. आयआयटी दिल्ली विभागातील शुभम कुमार अव्वल ठरला, तर आरोही देशपांडे हिने महिला उमेदवारांमध्ये प्रथम स्थान पटकावले. शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवून कॉमन रँक लिस्ट (सीआरएल) मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या परीक्षेला बसलेल्या सुमारे १.८ लाख उमेदवारांपैकी ५६ हजार ८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयआयटी रुरकीने जाहीर केलेल्या निकालामुळे देशभरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.

आयआयटी रुरकीने जाहीर केलेल्या निकालानुसार, शुभम कुमारने राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्यापाठोपाठ आयआयटी दिल्ली विभागातील कबीर चिल्लर आणि जतैन चहर यांचा क्रमांक लागला. त्यामुळे या निकालामध्ये आयआयटी दिल्लीचा वरचष्मा दिसून येत आहे. जेईई ॲडव्हान्स २०२६ साठी देशभरातून १ लाख ८७ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा १७ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेच्या दोन्ही परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७९ हजार ६९४ विद्यार्थी उपस्थित हाेते.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५६ हजार ८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १० हजार १०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. ही परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत, तर पेपर २ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत देशभरातील केंद्रांवर घेण्यात आला होता. पात्र उमेदवार आता जॉइंट सीट ॲलोकेशन अथॉरिटीद्वारे आयोजित समुपदेशन आणि जागा वाटप प्रक्रियेत सहभागी होतील.

गुणपत्रिकेत एकूण गुणांचा समावेश असतो. हे गुण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांवरून मोजले जातात. गुणवत्ताधारकांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवारांना विषयनिहाय आणि सर्व विषयांच्या एकूण गुणांमध्ये गुण मिळवणे आवश्यक आहे.

जेईई ॲडव्हान्स ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे दिल्या जाणाऱ्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्याचे प्रवेशद्वार आहे.

निकाल कसा पाहता येणार

अधिकृत जेईई ॲडव्हान्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे.