मुंबई : जेईई ॲडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना आयआयटीचे दरवाजे उघडतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त दोनच संधी उपलब्ध असतात. त्यामुळे इयत्ता बारावीमध्ये नियमित वर्गात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या संधीच्या तयारीसाठी पुरेसा मिळत नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना एकच संधी मिळत असल्याने त्याने आयआयटी प्रवेशाला मुकावे लागते. त्यामुळे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सलग तीन संधी देण्यात याव्यात किंवा तीन वर्षांत दोन संधी देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आयआयटी परिषद आणि संयुक्त प्रवेश मंडळाकडे (जेएबी) निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २५ हजार स्वाक्षऱ्या मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
जेईई ॲडव्हान्स्ड ही केवळ प्रवेश परीक्षा नसून देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग आहे. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी मेहनत घेत असतात. मात्र, सध्याच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना सलग दोनच प्रयत्न करता येतात. मात्र जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी असलेली जेईई मुख्य परीक्षेसाठी तीन प्रयत्नांची संधी दिली जाते. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान तपासले जात नाही, तर संकल्पनांची सखोल समज, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांची तयारी आणि कामगिरीची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. काही विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या अतिरिक्त तयारीनंतरही अपेक्षित कामगिरी करता येत नाही. इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीची अट असते. बोर्ड परीक्षा आणि प्रात्यक्षिकांचा विद्यार्थ्यांना ताण बारावीच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षाही पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
त्याचप्रमाणे देशातील सर्व विद्यार्थ्यांना तयारीसाठी समान वातावरण, मार्गदर्शन आणि शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील अनेक विद्यार्थी बारावीनंतरच जेईईची तयारी सुरू करतात. याउलट काही विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच खासगी मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध तयारीची संधी मिळते. ही परीक्षा एकाच दिवशी आणि मोठ्या मानसिक दबावाखाली घेतली जाते. अशा वेळी आरोग्याच्या समस्या, परीक्षेची भीती, मानसिक ताण किंवा किरकोळ चुका यांचा निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नाची संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करता येईल, असा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
मूल्यमापन पद्धतीही कायम राहणार
तिसऱ्या प्रयत्नामुळे स्पर्धा वाढण्याबाबत गैरसमज जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला तिसरा प्रयत्न दिल्यास स्पर्धा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हा गैरसमज आहे. तीन संधी उपलब्ध केल्याने आयआयटीमधील उपलब्ध जागांची संख्या बदलणार नाही आणि परीक्षेची काठिण्यपातळी तसेच मूल्यमापन पद्धतीही कायम राहणार आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रयत्नांमुळे प्रवेशाचे निकष शिथिल न होता अधिक विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती विद्यार्थी यश मालोदे यांनी दिली.
