मुंबई : देशातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची परीक्षा समजल्या जाणाऱ्या जेईई मुख्य २०२६ सत्र २ परीक्षेची उत्तरतालिका सोमवारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.

विद्यार्थ्यांकडून आलेल्या आक्षेपांची तज्ज्ञ समितीकडून पडताळणी केल्यानंतर आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. अंतिम उत्तरतालिका ही निकालासाठी आधारभूत ठरणार आहे. सुमारे ११ लाखांहून अधिक उमेदवार निकालाची प्रतीक्षा करत आहेत.

यंदा सत्र २ परीक्षेसाठी सुमारे ११ लाख २३ हजार उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी बीई/बीटेक (पेपर १) साठी सुमारे ११ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर एकूण उपस्थिती जवळपास ९३ टक्के इतकी होती. २ ते ८ एप्रिलदरम्यान ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर पार पडली. यापूर्वी एनटीएकडून भौतिकशास्त्र विषयातील दोन प्रश्न वगळण्यात आले आहेत.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

निकाल, गुणपत्र आणि ऑल इंडिया रँक (एआयआर) यादी अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थी आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून गुणपत्रिका मिळवू शकतात. निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने संकेतस्थळांवर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने एनटीएकडून आणखी दोन ते तीन लिंक उपलब्ध करण्यात येणार आहेत.

अंतिम उत्तरतालिका कशी पाहावी?

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन JEE Main 2026 Final Answer Key या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर पीडीएफ स्वरूपात उत्तरतालिका उपलब्ध होईल. ती डाउनलोड करता येणार आहे.

निकाल कसा पाहाल

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, या संकेतस्थळावर JEE Main Session 2 Result 2026 या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज क्रमांक व पासवर्ड किंवा जन्मतारीख नोंदवावे. त्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल; ते डाउनलोड करून प्रिंट घ्या

निकालानंतर समुपदेशन प्रक्रिया

निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवार संयुक्त आसन वाटप प्राधिकरणच्या समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यामार्फत एनआयटी, आयआयटी, तसेच इतर केंद्रीय निधी प्राप्त संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. जे विद्यार्थी कट-ऑफ गाठू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, खासगी विद्यापीठे किंवा पुढील वर्षी पुन्हा परीक्षा देण्याचे पर्याय खुले आहेत.

पर्सेंटाइल पद्धतीने निकाल जाहीर

जेईई मुख्यचा निकाल पर्सेंटाइल स्वरूपात जाहीर केला जातो. विविध शिफ्ट्समधील पेपरच्या काठिण्यपातळी लक्षात घेऊन ‘समानीकरण’ प्रक्रिया वापरली जाते. पर्सेंटाइल म्हणजे त्या विद्यार्थ्याने इतर किती टक्के उमेदवारांपेक्षा समान किंवा अधिक गुण मिळवले आहेत.