JEE Main high cutoff analysis 2026: देशातील आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षेत चांगले पर्सेंटाईल मिळवणे महत्त्वाचे असून मागील काही वर्षांमध्ये जेईई परीक्षेतील कटऑफ वाढतच आहे. यंदा या कटऑफने विक्रमी पातळी गाठली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २०१९ मध्ये जेईईचा कटऑफ ८९.७ पर्सेंटाइल होता. तो यंदा ९३.४ पर्सेंटाइलवर पोहचला आहे. ही वाढ मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मानली जात आहे. त्यामुळे यंदा आयआयटीच्या प्रवेशाची स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रवर्गनिहाय वाढलेला कटऑफ
राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) आकडेवारीनुसार, २०१९ ते २०२३ दरम्यान सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा कटऑफ ८८ ते ९१ पर्सेंटाइलच्या दरम्यान स्थिर होता. मात्र, मागील वर्षापासून त्यात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. ही वाढ केवळ सर्वसाधारण प्रवर्गामध्येच नसून, अन्य सर्व प्रवर्गांमध्येही कटऑफमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. इडब्ल्यूएस प्रवर्गाचा कटऑफ २०१९ मध्ये ७८.२ वरून २०२६ मध्ये ८२ वर पोहचला आहे. तर ओबीसी प्रवर्गाचा कटऑफ ७४.३ वरून ८०.९ इतका झाला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हा कटऑफ ५४ वरून जवळपास ६४ पर्यंत वाढला असून, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तो ४४.३ वरून ५२ पर्यंत गेला आहे. एकूणच, सर्व प्रवर्गांमध्ये ४ ते १० पर्सेंटाइल पॉइंट्सपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनामध्ये किंचित घट
करोना काळामध्ये या कटऑफमध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती. २०२१ मध्ये सर्वसामान्य प्रवर्गाचा कटऑफ ८७.८ पर्सेंटाइलवर आला होता. त्यानंतर २०२२ मध्ये ८८.४ वर पोहोचला. मात्र, त्यानंतरच्या तीन वर्षांत कटऑफमध्ये जवळपास पाच पर्सेंटाइलने वाढ झाली आहे.
स्पर्धा वाढण्यामागची कारणमिमांसा
या वाढत्या कटऑफमागे उमेदवारांची वाढती संख्या हे प्रमुख कारण मानले जात आहे. जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१९-२० मध्ये सुमारे ११ ते १२ लाख इतकी होती. तर २०२५-२६ मध्ये ही संख्या १५ लाखांहून अधिक झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत असली तरी आयआयटीमध्ये असलेल्या जागांची संख्या मात्र त्या वेगाने वाढलेली नाही. त्यामुळे प्रवेशासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होत आहे.
एकूणच, वाढती स्पर्धा, उमेदवारांची संख्या आणि मर्यादित जागा या तिन्ही घटकांमुळे आयआयटी प्रवेशाचा मार्ग अधिकच कठीण बनत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
