माहुल गावातील एक सोनार कोळी महिलांचे सात किलो सोने आणि ४५ लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. ऐन नारळीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच गावातील महिलांवर हे संकट कोसळले आहे. सोमवापर्यंत ९० हून अधिक महिलांनी फसवले गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
 चेंबूर जवळील माहुल गावात उत्तमकुमार माला उर्फ राजूभाई सोनार (३३) याने पाच वर्षांपूर्वी आपले दुकान थाटले होते. इतरांपेक्षा कमी दरात काम आणि चोख व्यवहाराने त्याने गावातील महिलांचा विश्वास संपादन केला होता.
नारळीपौर्णिमेचा सण जवळ आल्याने अनेक महिलांनी त्याच्याकडे दागिने बनविण्यासाठी दिले होते. परंतु हे दागिने देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता. शेवटी नारळीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सर्वाचे दागिने तयार करून देईन, असे आश्वासन त्याने दिले होते. पण रविवारीच त्याच्या घराला टाळे असल्याचे आढळले. तो सोमवारी परत येईल अशी गावातील लोकांना आशा होती. पण सोमवारीही त्याचा मोबाइल बंद होता. तो पत्नी आणि आपल्या भावासह राहत्या घरातून फरार झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी आणर्खी तक्रारी वाढण्याची शक्यता असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले.