#MeToo या चळवळीची सुरुवात करून चर्चेत आलेल्या तनुश्री दत्ताने आणखी एक वक्तव्य केले आहे. अभिनेत्री जिया खान, अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी या दोघींनी सिनेसृष्टी आणि टीव्ही दुनियेतील पुरुषी वर्चस्वाला कंटाळून आत्महत्या केली. मी कशी जगले हे माझे मलाच ठाऊक आहे असे तनुश्रीने म्हटले आहे. जून २०१३ मध्ये जिया खानने गळफास लावून आत्महत्या केली. तर एप्रिल २०१६ मध्ये प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. या दोन्ही आत्महत्यांमुळे हिंदी सिनेसृष्टी आणि टीव्ही जगत हादरले होते. आता याच दोन घटनांचा संदर्भ तनुश्री दत्ताने स्वतःशी जोडला आहे.

हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर माझ्यासोबत नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केले. त्यानंतर मनसेच्या गुंडांनी माझी कार फोडण्याचा प्रयत्न केला. माझे आई वडीलही माझ्यासोबत होते. त्या घटनेचा गंभीर परिणाम माझ्या मनावर झाला. मी इतकी निराश झाले होते की मला आतून असे वाटत होते की जीव द्यावा. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केले आहे. २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर माझ्या हाती काही कामं होती. मी ती संपवण्याच्या मागे लागले होते कारण मला मनातून असे वाटत होते की आत्महत्या करावी.

मला सातत्याने मानसिक छळाला सामोरे जावे लागले. मला फोनवरून धमक्याही येत होत्या. माझ्याबाबत जी काही चर्चा सातत्याने त्यावेळी आजूबाजूला घडत होती त्यामुळे मी प्रचंड निराश झाले होते. स्वतःचे आयुष्य संपवावे असा विचार मनात यायचा. सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मी खूपच नाराज असायचे. २०१३ मध्ये मी जिया खानच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि त्यानंतर काही वर्षांनी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी वाचली. या दोन्ही बातम्या वाचल्या तेव्हा मला हेच वाटले की या दोघींना किती मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागला असेल. त्याचमुळे त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला. माझ्यासोबत जो प्रसंग घडला त्यातून मी कशीबशी बाहेर पडले नाहीतर या दोघींसारखेच माझ्याही मनात आत्महत्येचे विचार येत होते असेही तनुश्रीने म्हटले आहे.

माझ्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगांना आणि त्या सगळ्या वातावरणाला मी कशी सामोरे गेले हे माझे मलाच ठाऊक आहे. तो अनुभव माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट अनुभव होता असेही तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्री दत्ताला जेव्हा विदेशातील MeToo मोहिमेबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. तर नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. मात्र तनुश्री दत्तानंतर हिंदी सिनेसृष्टीतील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. आता त्यावेळी जे काही घडलं त्यामुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचार यायचे असे तनुश्रीने स्पष्ट केले आहे.