जियाने स्वत: गळफास लावून आत्महत्या केलेली नाही, तर तिचा खून केल्यानंतर त्याला आत्महत्येचे रुप देण्यात आल्याचा आरोप करीत जियाची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, जिया खानच्या नखांमध्ये मांसाचे कण आणि रक्त सापडलं होतं, असं जुहू पोलिसांनी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या पुनर्तपासणी अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे जियाच्या आईने केलेल्या आरोपांना अधिक बळ मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.
जिया खानच्या मृत्युचा तपास हा हत्या म्हणून करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. कलीना फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात जियाच्या नखांमध्ये मांस आणि रक्त असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय तिच्या अंतर्वस्त्रांवरही रक्ताचे डाग होते असंही अहवालात नमूद करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुन्हा तपास करताना पोलिसांनी पुन्हा एकदा जिया खानच्या खोलीचा पंचनामा केला. तसंच बेडवर पडलेले रक्ताचे नमुने आणि आणखी काही महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या.
मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात येत्या २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांचा अहवाल सादर होईल आणि राबिया खान यांची बाजू ऐकल्यानंतर कोर्ट आपला निर्णय देणार आहे.