मुंबई : भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी आता महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेतला असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठवले आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी विनंती केली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या अर्थात राणी बागेच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत वाघ, बिबट्या, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह या प्राण्यांकरीता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. त्यापैकी काही पिंजऱ्यांमध्ये प्राणी आणले आहेत. मात्र आशियाई सिंह आणण्यासाठी पालिकेचे गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जुनागढ येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून दोन जोडी सिंह आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जिजामाता उद्यानात सिंह आणण्याचे पालिकेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

राणी बागेला सिंह मिळवून देण्यासाठी आता महापौर रितू तावडे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्याच आठवड्यात महापौरांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि वनमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. तसेच यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. पेग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पेंग्विनची जोडी देऊन सिंह आणण्याचा प्रस्तावही बारगळला

सिंह आणण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले. प्राण्यांची देवाण घेवाण करण्याच्या तत्वानुसार त्याबदल्यात सक्करबाग प्राणी संग्रहालयाने प्राणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आधी दोन जोडी ग्रॅट झेब्राची मागणी केली होती. मात्र जिजामाता उद्यानात झेब्रा नसल्यामुळे पालिकेने ते विकत घेण्याचे ठरवले होते. मात्र झेब्रा आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जिजामाता उद्यानात झेब्रासाठी अधिवासही तयार नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. मग पेंग्विन देण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. मात्र सक्करबाग प्राणी संग्रहालयाकडे पेंग्विन ठेवण्याची शीतगृहाची व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे राणीच्या बागेतील पिंजरे गेल्या चार वर्षांपासून सिंहाच्या डरकाळीच्या प्रतीक्षेत आहेत. आता महापौरांच्या पत्रानंतर प्राणीसंग्रहालयाला सिंह मिळणार का याची उत्सुकता आहे.

सिंहाचे पिंजरे आधीच तयार

दरम्यान, आशियाई सिंहाकरीता प्राणी संग्रहालयाने आधीच वैशिट्यपूर्ण पिंजऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्याच्या बाहेरील बाजूस गीर येथील मलधारी आदिवासी प्रजातीच्या घरांप्रमाणे रचना करण्यात आली आहे. गीर येथील आशियाई सिंहांची प्रजाती प्रख्यात असल्यामुळे त्या धर्तीवर आवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले आहे. सिंहांच्या नैसर्गिक गरजा भागविण्याकरीता गुहा, सिंहास लपण्यासाठी छोटी झुडुपे, सावलीच्या जागा, मोठी झाडे, पाण्याचा छोटा जलाशय, सिंहास बसण्यास मोठे दगड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र हा पिंजरा सध्या रिकामा आहे. या पिंजऱ्यातील हिरवळीची देखभाल करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राणी संग्रहालयात हे आहेत प्राणी

प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.